राज्यात सध्या ‘स्थगिती सरकार’
विरोधी पक्ष नेते अजितदादांची सरकारवर सडकून टीका
वार्ताहर/ वाठार किरोली
महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांना केवळ स्थगिती देण्याचे एकमेव काम सध्याचे सरकार करत आहे. तसेच तोंडे बघून हे सरकार निधी देण्याचे काम करीत आहे त्यामुळे यांना ‘स्थगिती सरकार’ म्हटले पाहिजे असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी धामणेर येथे व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील होते. व्यासपीठावर उपस्थित खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सुभाषराव शिंदे, दीपक पवार, बाळासाहेब सोळसकर, कांतीलाल पाटील, भागवतराव घाडगे, सरपंच चंद्रकांत व्होवाळे, उपसरपंच प्रवीण क्षीरसागर, चेअरमन प्रदीप क्षीरसागर, व्हाईस चेअरमन अंकुश देसाई आदी उपस्थित होते.
अजितदादा पवार पुढे म्हणाले, सध्या राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच सरकार चालवत असून राज्यात यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी महिलांना सत्तेत नेहमी स्थान दिले. परंतु सध्याच्या सरकारला एकाही महिला आमदाराला मंत्रीपद देता आले नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. निवडून आलेले या पक्षाचे आमदार फुटायला लागले तर नेहमी राज्यात स्थिर सरकार राहिल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राज्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून जिह्यात कोयता गँग प्रश्न असेल किंवा दौंडमधील घटनेवरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण, शरद पवारांच्या विचाराचा मानला जातो. परंतु जिह्यात अलीकडे राजकीय गडबड होत आहे. जिह्यात फक्त तीनच राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पाटण आणि कोरेगावची जागा राष्ट्रवादीकडून का गेली हेच आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे काही चुकले आहे का त्याचे चिंतन आम्ही करू असे सांगितले. स्वच्छतेत धामणेर गावाने शहाजी क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱयांनी आणि ग्रामस्थांनी अनेक पुरस्कार मिळवले असून त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात गावाचे नाव उज्वल झाले आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतीपूरक जोड व्यवसाय सुरू करायला हवेत. तसेच गावात महिलांचे उद्योग व्यवसाय सुरू आहेत ही आनंदाची बाब आहे. तसे व्यवसाय इतर गावात सुरू करण्यासाठी धामणेरवासीयांनी प्रयत्न करावेत.
सरकारचा प्रशासनावर वचक नाही-आ. बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यामुळे सहकाराची बीजे पेरली गेली आहेत. भाजपाने काही महिन्यापूर्वी शिवसेनेचा एक गट फोडून राज्यात सरकार स्थापन केले आहे. परंतु प्रशासनावर वचक नाही कामाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे प्रशासन स्वस्त झाले असून हे पुरोगामी महाराष्ट्राला मानवणार नाही.
शहाजी क्षीरसागर यावेळी बोलताना म्हणाले की, स्वच्छता अभियानात 18 वेगळे पुरस्कार मिळवलेले गाव म्हणजे धामणेर आहे. असे म्हणतात विकास करताना लोक दमलेली असतात पण धामणेर दमलेले नाही म्हणून धामनेरची एक वेगळी ओळख आहे. सर्व बाबतीत महिलाना सक्षम करण्यासाठी मारुती ट्रस्टच्या माध्यमातून लिज्जत पापड व गारमेंट व्यवसाय महिलांसाठी सुरू केला आहे. अजितदादांच्या माध्यमातून राज्यस्तरावर संधी मिळाली. तसेच कृष्णेचा कलश आम्ही तुम्हाला भेट देत आहोत. धामणेरने स्वच्छता अभियानात आत्तापर्यंत 18 पुरस्कार मिळवले असून विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मारुती ट्रस्टच्या मार्फत महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्याचा लिज्जत पापड व गारमेंट व्यवसायातून प्रयत्न चालू आहे.
यावेळी ग्रामपंचायत इमारत व विकास सेवा सोसायटी इमारत यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि कार्यकर्ते तसेच धामणेर सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुकर पवार यांनी केले. आभार प्रवीण क्षीरसागर यांनी मांडले.