राज्यात निवडणूक अधिसूचना आज
लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज : दक्षिण कर्नाटकातील 14 मतदारसंघासाठी 26 एप्रिलला मतदान
वार्ताहर/ बेंगळूर
राज्यात दोन टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून येथील पहिल्या टप्प्यात 14 मतदारसंघांत 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याकरिता गुरुवारपासून अधिसूचना जारी होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. 4 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल अंतिम मुदत आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
दक्षिण कर्नाटकातील 14 मतदारसंघात पहिला टप्पा
राज्यात प्रथम दक्षिण कर्नाटक भागातील 14 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर सेंट्रल, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. चित्रदुर्ग, चामराजनगर आणि कोलार हे तीन एससी राखीव मतदारसंघ आहेत.
काँग्रेसकडून चार उमेदवारांची घोषणा होणे बाकी
राज्यातील सत्ताधारी काँग्रेस, विरोधी पक्ष भाजप आणि निजदसह नोंदणीकृत राजकीय पक्षांनी उमेदवार निवड केली आहे. भाजप आणि निजदने युती केली असून जागा वाटाघाटीनुसार अनुक्रमे 25 आणि 3 उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसकडून अद्याप बळ्ळारी, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या 4 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.
प्रचाराचा जोर वाढणार
गुरुवारी राज्यात लोकसभा निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात 14 मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढणार आहे. सर्वच राजकीय पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांचा दक्षिण कर्नाटकातील मतदारसंघांचा दौरा वाढणार आहे. पक्षातील स्टार प्रचारकांची घोषणा झाल्यानंतर त्या नेत्यांकडून प्रचारसभांच्या तारखा निश्चित होतील.
मातब्बर मंडळी निवडणूक आखाड्यात
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मंड्या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, म्हैसूरमधून वडेयर राजघराण्याचे यदूवीर वडेयर, बेंगळूर ग्रामीणमधून डी. के. सुरेश व ख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ, तुमकूरमधून माजी मंत्री व्ही. सोमण्णा, बेंगळूर उत्तरमधून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, उडुपी-चिक्कमंगळूरमधून विधान परिषद विरोधी नेते कोटा श्रीनिवास पुजारी आखाड्यात आहेत.