For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

06:35 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान
Advertisement

14 मतदारसंघात 227 उमेदवार रिंगणात : जाहीर प्रचाराची सांगता

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 14 लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता झाली असून मंगळवार दि. 7 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह 227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. मतदार नसलेल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेत्यांना आपापले मतदारसंघ सोडावे लागले. मतदान संपण्यापूर्वी 48 तासांचा कालावधी शून्य कालावधी म्हणून घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत निवडणूक प्रचारासाठी सार्वजनिक सभा घेण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर प्रतिबंधित आहे.

Advertisement

दुसऱ्या टप्प्यातील उत्तर कर्नाटक भागातील चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा या मतदारसंघात एकूण 227 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 2,59,52,958 मतदार मतदानासाठी पात्र असून 28,269 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी सर्व 14 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. बसप 9, नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्ष 73 आणि 117 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 206 पुऊष आणि 21 महिला उमेदवार आहेत.

संबंधित मतदारसंघाच्या सीमेवर चेकपोस्ट उभारून मतदारसंघाच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमधील राज्याच्या सीमा सायंकाळी 6 पासून बंद केल्या जातील, असे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाने कळविले आहे.

मद्यविक्रीवर बंदी

मतदानाचा कालावधी संपेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी नाही. इतर राज्यातूनही दारू आणता येणार नाही. कर्नाटक सीमेपासून 5 कि.मी.च्या परिघात इतर राज्यांतील दारूची दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिदर, कलबुर्गी, रायचूर, यादगिरी, बळ्ळारी, कारवार, बेळगाव आणि विजापूर यांची सीमा तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्राला लागून आहे.

मंगळवारी 14 मतदारसंघात सरकारी सुटी

सर्व कर्मचारी आणि कामगारांना मतदान करण्यास 7 मे रोजी पगारासह रजा मंजूर करण्याची विनंती शेजारील राज्यांच्या राज्य सरकारांना केली आहे. राज्य सरकारने या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना मतदानाच्या दिवशी सरकारी सुटी जाहीर केली आहे. तसेच उद्योग आणि इतर संस्थांना रोजंदारी कामगार आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना मतदानाची परवानगी देण्यासाठी वेतनासह रजा मंजूर करण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement
Tags :

.