राज्यसभेतील 72 खासदार निवृत्त
संसदेत निरोपपर कार्यक्रम : पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींकडून स्नेहभोजनाचे आयोजन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभेतील 72 खासदार गुरुवारी निवृत्त झाले. संसद अधिवेशनादरम्यान गुरुवारी कार्यकाल संपुष्टात आलेल्या सर्व राज्यसभा सदस्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या निरोपाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना संबोधित करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निरोपपर कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी एकत्रित फोटोसेशनचा कार्यक्रमही पार पडला.
संसदेच्या सभागृहात आपल्याला विविधता जाणवते. या चार भिंतींमध्ये आपण बराच वेळ घालवतो. देशाच्या कानाकोपऱयातील समस्या आणि भावना आपल्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचतात. येथील अनुभव चार भिंतींच्या पलीकडे चारही दिशांना घेऊन चला, असे मोदींनी संबोधित केले. देशाला दिशा देणाऱया महत्त्वाच्या गोष्टी आपल्या काळात आपण सभागृहात पाहिल्या, त्या देशाच्या येणाऱया पिढय़ांना उपयोगी पडतील, अशा महत्त्वाच्या गोष्टी लिहिण्याचाही आपला प्रयत्न असायला हवा, असे पंतप्रधानांनी सर्वांना सांगितले.
आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात देशाच्या महापुरुषांनी देशाला खूप काही दिले आहे. आता आमची वेळ आहे. इथून निघालेल्या सदस्यांना फार काही मिळणार नाही, पण इथून मोठय़ा व्यासपीठावर जाऊन तुम्ही लोकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रेरणा द्याल, अशी आशा असल्याचे सांगत पंतप्रधानांनी सर्वांना पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.