रंग बदलणाऱ्या गुहा
आपली पृथ्वी अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे. आपल्याला 7 आश्चर्ये माहीत असतात, कारण त्यांची मोठी प्रसिद्धी झालेली आहे. तथापि, अन्यही अनेक आश्चर्ये अशी आहेत की या सात आश्चर्यांनाही ती मागे टाकतील. पण ती बऱ्याच प्रमाणात अप्रसिद्ध असल्याने त्यांच्याविषयी फारशी माहिती असत नाही.
अशाच आश्चर्यांमध्ये चीली देशातील पॅटागोनिया येथील जनरल कॅरेरा सरोवराच्या परिसरात असलेल्या काही प्राचीन गुहांचा समावेश होतो. या गुहा संगमरवर या दगडाच्या बनलेल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्या असे आहे, की या गुहांच्या आतील भागाचा रंग दिवसभर बदलत राहतो. सूर्यप्रकाशाचे परावर्तन अशा प्रकारे या गुहांच्या भिंतीवर होत राहते की दर तासाला त्यांचा रंग वेगळाच झालेला दिसून येतो. या नितांत सुंदर गुहा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. तथापि, अद्यापही त्या वारेमाप प्रसिद्धीच्या झोतापासून दूरच राहिलेल्या आहेत.
या गुहांची निर्मिती पाण्याच्या धारदार प्रवाहांमुळे झाली आहे. त्या निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागलेली आहेत. शेवटचे हिमयुग संपल्यानंतर जेव्हा हिम वितळण्याला प्रारंभ झाला, त्यानंतर नद्या आणि पाण्याचे इतर नैसर्गिक प्रवाह वेगाने वाहू लागले. वाहत्या पाण्याच्या सततच्या धारेमुळे डोंगर कापले गेले आणि या गुहा निर्माण झाल्या, असे भूगर्भ संशोधकांचे म्हणणे आहे. अशा अनेक गुहा जगात आहेत. पण या गुहांची संरचना काही वेगळ्याच प्रकारची आहे. या गुहांच्या भिंती आणि छत नैसर्गिक असले तरी त्याच्यावरची चकाकी पाहता, ती कोणीतरी मुद्दाम केल्यासारखी वाटते. या गुहांचा संगमरवर अशा प्रकारचा आहे की तो सारखा रंग बदलत असल्याचा आभास निर्माण होतो. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही मोठी असते.