युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची कोंडी
बचावासाठी ‘प्लॅन-बी’ची तयारी : हवाई क्षेत्र बंदमुळे विमान अर्ध्या वाटेतून माघारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे तेथील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. हवाई हल्ल्यांमुळे भारतीय नागरिकांना आणण्यासाठी जाणाऱया एअर इंडियाच्या विशेष विमानालाही अर्ध्या मार्गावरून परतावे लागले. मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्लॅन-बी’वर काम सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. या बैठकीमध्ये भारतीयांच्या बचावासाठी पर्यायी मार्गांवर विचारमंथन केले जात आहे. दुसरीकडे, कीव्हमधील भारतीय राजदुतांनीही संघर्षामुळे दूतावास बंद होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाने तेथे राहणाऱया भारतीय नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकार सर्व भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. युक्रेनमध्ये सध्या अनिश्चितता आहे, त्यामुळे शांत राहून असाल त्या ठिकाणी सुरक्षित राहण्याची सूचना युपेनमधील भारतीयांना देण्यात आली. याशिवाय जे लोक कीव्हला जाण्यासाठी प्रवास करण्याच्या विचारात आहेत किंवा जे पश्चिम कीव्हकडून येणार आहेत त्यांनी आपापल्या शहरात परतावे असेही या सांगण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना दुतावासाकडून यानंतरही माहिती आणि ऍडव्हायजरी देण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी युपेनियन एअरलाईन्सचे एक विमान 182 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून घेऊन दिल्लीला आले. यापूर्वी एअर इंडियाच्या विमानाने 242 भारतीय युपेनमधून परतले होते.
घाबरू नका, धीर धरा : सरकारचे आवाहन
या मोहिमेदरम्यान युपेनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न घाबरण्याचे आवाहन सरकारने केले आहे. यापूर्वी भारताने इराक, कुवेतसारख्या ठिकाणांहूनही भारतीयांना परत आणले आहे. युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पावले उचलत आहे.
हवाई मार्ग बंद, रस्ते-रेल्वे सेवा विस्कळीत
युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे प्लॅन-बी सुरू असून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद आहे, रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि रस्ते कोलमडले आहेत. अशास्थितीत भारतीय नागरिकांनी संयमाने परिस्थितीला सामोरे जावे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.