युक्रेनची मारिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत लवकरच झळकणार
शिवकार्तिकेयन हा दक्षिणेतील दिग्गज कलाकार असून तो स्वतःच्या चाहत्यांना एका मागोमाग एक चित्रपटांद्वारे भुरळ पाडत आहे. सध्या तो दिग्दर्शक अनुदीपसोबत मिळून स्वतःच्या पुढील चित्रपटाच्या तयारीत आहे, शिवकार्तिकेयनचा पुढील नाव न ठरलेला चित्रपट तमिळ-तेलगू भाषेत येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्याची नायिका म्हणून युक्रेनच्या अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे.
‘एसके 20’च्या निर्मात्यांनी शिवकार्तिकेयनची नायिका म्हणून युक्रेनची अभिनेत्री मारिया रियाबोशपकाशी संपर्क साधला आहे. याचबरोबर या चित्रपटात आणखीन एक अभिनेत्री झळकणार असून तिचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. एसके20 हा शिवकार्तिकेयनचा पहिला तेलगू चित्रपट असणार आहे. याची निर्मिती सुरेश प्रॉडक्शनकडून केली जात आहे. ए. थमन यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे.
25 वर्षीय मारियाने ‘एअर’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. मारियाची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय भूमिका डिस्ने प्लस हॉटस्टारची सीरिज ‘स्पेशल ऑप्स 1.5 ः द हिम्मत स्टोरी’मधील आहे. आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत असून यात शिवकार्तिकेयन आणि सत्यराज तसेच प्रेमगी सह अन्य कलाकार असणार आहेत.