‘युएनएचआरसी’मधून रशियाची हकालपट्टी
रशियाच्या विरोधात 93 मते : भारतासह 58 देश तटस्थ : 24 देशांचे प्रस्तावाविरोधात मतदान
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
युक्रेनविरोधात युद्ध छेडणाऱया रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य मानवाधिकार संस्थेतून (युएनएचआरसी) निलंबित करण्यात आले आहे. मतदानादरम्यान रशियाच्या विरोधात 93 आणि बाजूने 24 मते पडली. भारतासह 58 देश मतदानापासून दूर राहिले. मतदानानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाची मानवाधिकार परिषदेतून हकालपट्टी केली आहे. ‘युएनएचआरसी’मध्ये 47 सदस्य देश आहेत.
रशिया-युपेन युद्धाला गुरुवारी 43 दिवस पूर्ण झाले आहेत. गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत झालेल्या मतदानात रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (‘युएनएचआरसी’) बाहेर काढण्यात आले. बुचा हल्ल्यानंतर गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत रशियाला ‘युएनएचआरसी’मधून बाहेर काढण्यासाठी मतदान करण्यात आले. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबनाची मागणी करणाऱया ठरावाच्या बाजूने 93 देशांनी मतदान केले. तर 24 देशांनी विरोधात मतदान केले. तसेच भारतासह 58 देशांची तटस्थ भूमिका घेतली.
युपेनमधील रशियाच्या हल्ल्याचा निषेध करणाऱया सर्व ठरावांवर ‘युएनएचआरसी’मध्ये मतदानादरम्यान भारत अनुपस्थित होता. आम्ही संयुक्त राष्ट्रात सावध आणि विचारांवर आधारित असा दृष्टिकोन बाळगतो. निषेधाच्या प्रस्तावावर आम्ही नक्कीच विचार करू, पण स्वतःचे हित लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असे गेल्या महिन्यात परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी स्पष्ट करत भारताची भूमिका स्पष्ट केली होती.
युक्रेनच्या आवाहनाला मिळाली दाद
संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष सत्रात ‘युएनएचआरसी’मधून रशियाला निलंबित करण्याची मागणी करणाऱया ठरावावर मतदान झाले. चर्चेदरम्यान, कौन्सिलमधून रशियन फेडरेशनचे निलंबन हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे युपेनच्या प्रतिनिधीने सांगितले. रशियन फेडरेशनचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून निलंबन करणे हे सर्व सदस्य राष्ट्रांचे कर्तव्य आहे. त्याचवेळी, रशियाच्या प्रतिनिधीने आपल्याला समर्थन देण्याचे आवाहन सदस्य राष्ट्रांना केले होते.
युक्रेनने केले निर्णयाचे स्वागत
युपेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्याच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या निर्णयाचे स्वागत केले. या ठरावाला पाठिंबा देणाऱया आणि इतिहासाची उजवी बाजू निवडणाऱया सर्व सदस्य राष्ट्रांचे आम्ही आभारी आहोत, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघात युद्ध गुन्हेगारांना स्थान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कठोर भूमिकेमुळे रशियाबाबत नाराजी
रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. अमेरिकेसह नाटो देशांनी त्याची तयारी सुरू केली होती. गेल्या 24 तासांत रशियन सैन्याने खार्किव्हमध्ये 48 वेळा गोळीबार केला आहे. द किव्ह इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बालाक्लिया भागात झालेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले, असे जी-7ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे.