‘यासम हाच’
भारतात ‘घराणेशाही’ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. प्रशंसेच्या दृष्टीनेही आणि चेष्टेच्या दृष्टीनेही. भारताला जगाच्या औद्योगिक नकाशात महत्त्वाचे आणि अढळ स्थान मिळवून देणारी जी प्रशंसनीय ‘घराणी’ आहेत, त्यांच्यात टाटा घराणे प्रारंभापासून अग्रभागी राहिले आहे. याच विश्वविख्यात घराण्यातले आणि सर्वार्थाने या घराण्यासमवेत देशाचाही मानबिंदू राहिलेले रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री उशीरा दु:खद निधन झाले. त्यांचे जाणे हे केवळ उद्योगजगताच्याच नव्हे, तर सर्वसामान्य भारतीयांच्याही हृदयाला चटका लावणारे आहे. ‘झाले बहु, होतील बहु, पण यासम हाच’ असे ज्यांच्यासंदर्भात नि:संशय म्हणता येते, असे ते होते. त्यांच्या कर्तृत्वासंबंधीची आणि दातृत्वासंबंधीची माहिती आजवर अनेकदा प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी ज्यावेळी 1991 मध्ये टाटा उद्योगसमूहाची आणि या समूहावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘टाटा सन्स’ या ‘होल्डिंग कंपनी’ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली तेव्हा, या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटी रुपयांकडून काहीशी अधिक होती. या उद्योगसमूहाचे सलग 21 वर्षे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर 2012 मध्ये ते निवृत्त झाले तेव्हा या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल 100 अब्ज डॉलर्स किंवा 7 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या पातळीवर पोहचली होती. 21 वर्षांच्या कालावधीत आपला उद्योग 70 पट किंवा 7 हजार टक्के वाढविण्याची किमया करुन दाखविणारे फार कमी उद्योगपती जगात असावेत. यावरुन त्यांची अफाट क्षमता आणि अतुलनीय बुद्धीमत्ता सिद्ध होते. कोणताही स्वतंत्र देश सुरळीत चालायचा असेल, तर त्या देशात संपत्ती निर्माण करणारी व्यक्तिमत्वे अधिक प्रमाणात जन्माला यावी लागतात. कारण पैशाशिवाय काहीच चालत नाही, ही वस्तुस्थिती असते. ‘साहुकार हे तो स्वराज्याचे भूषण’ असे छत्रपती शिवाजी महाराजांनीही म्हटले होते, असे इतिहासकारांनी नोंद करुन ठेवले आहे. साहुकार याचा अर्थ धनवान असा होतो. शिवाजी महाराजांचे हे उद्गार रतन टाटा यांच्या संदर्भात जितके खरे ठरले तितके क्वचितच अन्य कोणासंदर्भात खरे ठरले असतील. तथापि, रतन टाटा यांच्या कर्तृत्वाचा ‘संपत्तीचे निर्माणकार्य’ हा केवळ एकच मापदंड नव्हता. तर या कार्याला त्यांनी समाजसेवेची आणि दातृत्वाची तितक्याच तोलामोलाची जोड दिलेली होती. संपूर्ण टाटा घराण्याचेच हे वैशिष्ट्या आहे. शिक्षण, आरोग्य, वैज्ञानिक संशोधन, गरीबी उन्मूलन, समाजाचे सबलीकरण अशा विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये या घराण्याने आपला अमीट ठसा उमटविला आहे. रतन टाटा यांनी आपल्या घराण्याच्या औद्योगिक परंपरेसह ही सामाजिक परंपराही तितक्याच निष्ठेने आणि तन्मयतेने चालविली. रतन टाटा, त्यांचे घराणे आणि या घराण्याचा उद्योगसमूह यांनी आपली प्रतिमा केवळ ‘संपत्ती निर्माण करणारे यंत्र’ अशी कधीच बनू दिली नाही. समाजाच्या सुखदु:खाशी स्वत:ला जोडून घेण्याच्या या परंपरेला रतन टाटा यांनी समर्थपणे पुढे नेले. पावसात भिजणारे एक कुटुंब पाहून त्यांच्या मनात सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीची नॅनो कार निर्माण करण्याची कल्पना चमकली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणूनही दाखविली. सर्वसामान्यांविषयी ते किती संवेदनशील होते हे या उदाहरणावरुन स्पष्ट होते. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात टाटा उद्योगसमूहाचा अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड विस्तार झाला. मीठापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत आणि लोखंडापासून सुवर्णआभूषणांपर्यंत, तसेच घरांच्या बांधकामांपासून त्या घरांमध्ये प्यायल्या जाणाऱ्या चहापर्यंत एकही औद्योगिक क्षेत्र असे नाही की ज्यात टाटा समूहाने यश मिळविलेले नाही. उत्पादन क्षेत्राप्रमाणेच सेवा क्षेत्रातही या उद्योगसमूहाने ख्याती मिळविली आहे. हा सर्व विस्तार प्रामुख्याने रतन टाटा यांच्याच नेतृत्व काळात झालेला दिसून येतो. आज या उद्योगसमूहात महत्त्वाच्या अशा 30 कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी 20 हून अधिक कंपन्या रतन टाटा यांच्याच नेतृत्व काळात निर्माण झाल्या आणि बहरल्या. टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टायटन, टाटा प्रोजेक्टस्, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस्, व्होल्टास, ट्रेंट, क्रोमा, बिगबास्केट अशा अनेक कंपन्यांच्या माध्यमातून या समूहाने भारताचे उद्योगक्षेत्र व्यापले आहे. परराष्ट्रांमधील अनेक कंपन्याही रतन टाटा यांच्या काळात या उद्योगसमूहाने अधिग्रहित केल्या आणि उत्तमरित्या चालविल्या. भारताच्या नव्या संसद भवनाचे आणि प्रशासकीय संकुलाचे निर्माणकार्य करण्याचे उत्तरदायित्वही या समूहावर सोपविण्यात आले होते आणि ते त्याने निर्धारित कालावधीपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करुन दाखविले आहे. आजन्म अविवाहित राहून त्यांनी देश, उद्योग आणि समाजकार्य यांच्याकरिताच आपले आयुष्य समर्पित केले. उद्योग कसा चालवायचा, कसा जोपासायचा आणि कसा वाढवायचा याचा आदर्श वस्तूपाठ ज्या उद्योगपतींनी घालून दिला आहे, त्यांच्यात रतन टाटा यांचे स्थान अग्रभागी आहे, असे अनेक तज्ञांनी प्रतिपादन केले आहे. खरे तर भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक असे निकोप आणि मोकळे वातावरण कधीच नव्हते. ते तसे असले पाहिजे ही जाग भारताच्या धोरणकर्त्यांना खूपच उशीरा आली. पण हा धोरणविषयक अडथळाही रतन टाटा यांनी आपल्या उद्योगसमूहाच्या प्रगतीला मारक ठरु दिला नाही. हे करीत असताना त्यांनी आपले ‘भारतीयत्व’ तत्परतेने जपले. अमेरिकेतील प्रसिद्ध फोर्ड कंपनीने एकदा रतन टाटा यांचा अवमान केला होता. पण त्यांनी तो अवमान आव्हान म्हणून स्वीकारला आणि कारनिर्मिती क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळविले. त्यांनी टाटा मोटर्स ही आपली कंपनी फोर्डला विकण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर फोर्डचेच जॅग्वार आणि लँडरोव्हर हे गाजलेले ब्रँडस् विकत घेऊन आणि चालवून आपले ‘भारतीयत्व’ सिद्ध केले होते. त्यांच्यासंबंधात घडलेल्या अशा अनेक सत्यघटना आहेत. बुधवारी, वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी जेव्हा अखेरचा श्वास घेतला, तेव्हा या सत्यघटनांचे हृद्य आणि अविस्मरणीय अशा आठवणींमध्ये रुपांतर झाले आहे.