मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर शहरासह पाच गावांना पिण्याच्या पाण्याचे स्त्राsत ठरलेल्या मोडकाआगर धरणाऱया पाणीसाठय़ात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळताच नगराध्यक्षांनी दोन डंपर अडवून एका डंपरमधील माती परत पाठवली. तर टाकलेली माती परत नेण्यास सांगितले. त्याचबरोबर महामार्ग अभियंता आर. आर. मराठे यांना माहिती देऊनही ठेकेदाराच्या मुजोर व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये मोडकाघर ते शृंगारतळी रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. अर्धवट राहिलेल्या पुलाचे काम करण्यासाठी धरण परिसरात भरावाचे काम सुरु आहे. तर शृंगारतळी परिसरात रस्त्याच्यासाठी खोदाईचे काम सुरु आहे. खोदकामातून काढलेली माती डंपरमध्ये भरुन ती मोडकाआगरच्या धरणात टाकली जात आहे. ही माती नाल्यातील, गटारातील असून दुर्गंधीयुक्त आहे. शिवाय प्लास्टीकच्या पिशव्या, बाटल्या, काचेच्या बाटल्या, तुटलेल्या केबल आदी कचरा या धरणात टाकला जात आहे.
येथील जनतेच्या दुखत्या वर्मावर बोट ठेवत पुलाचे काम जलद गतीने करताना मोडकाआगरच्या धरणात आपण काय टाकतो आहोत, याचा विचारही मनीषा कन्स्ट्रक्शनचे इंजिनियअर, सुपरवायझर करत नाहीत. शृंगारतळीमध्ये दोन पूल पाडण्यात आले आहेत. या पुलाखालून सांडपाणी वाहते. श्रृंगारतळीमधील कचरा ज्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्ट साहित्ये, मटण, चिकन सेंटरमधील घाण ही याच पुलाखाली टाकली जाते. पाणी वहात होते. मनीषा कन्स्टक्शनच्या कामगारांनी पुलाच्या राडारोडय़ासहीत ही दुर्गंधीयुक्त माती धरणात भरावासाठी वापरली आहे. शिवाय रस्ते रुंद करताना तोडलेल्या झाडांची मुळे, फांद्या, खोदकाम करताना तोडलेल्या केबल हा कचराही धरणाच्या पाण्यात टाकला आहे. सदर घाण धरणाच्या पाण्यात टाकली जात असल्याचे समजता गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी तातडीने माती टाकण्याचे काम थांबवले. एक डंपर परत पाठवला. सुपरवाझरला फोन करुन ही माती उचलून नेण्यास सांगितले. मात्र नगराध्यक्षांच्या सुचनांकडे ठेकेदाराच्या मुजोर कर्मचाऱयांनी कानाडोळा केला आहे.
ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला महामार्ग अधिकाऱयांचे कसे पाठबळ असते ते महामार्ग प्राधिकरणचे अभियंता आर. आर. मराठे यांनी शासकीय उत्तर देऊन दाखवून दिले आहे. आम्ही ठेकेदाराला मोडकाआगरच्या धरणातील पाणी दुषित होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सध्या घडलेला प्रकार नेमका काय आहे ते पाहून तशा सूचना ठेकेदाराला करण्यात येतील. असे उत्तर श्री. मराठे यांनी दिले. परंतु हीच सुचना व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी महामार्गाचा एकही इंजिनिअर अथवा शासकीय कर्मचारी जाग्यावर नसल्याने महामार्ग अधिकाऱयांच्या या वागण्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.