मालवणात दिवसभरात 550 चाकरमानी दाखल
अनेक संस्थात्मक अन् होम क्वारंटाईन : ग्रामीण भागात तब्बल 484 चाकरमानी दाखल : ग्रामीण व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता : चाकरमान्यांच्या गाडय़ांचा शहरात बिनधास्त वावर
प्रतिनिधी / मालवण:
मालवण तालुक्यात रविवारी दिवसभरात 550 चाकरमानी दाखल झाले. यातील अनेकजण संस्थात्मक, तर मोठय़ा संख्येने होम क्वारंटाईन करण्यात आले. यात प्रामुख्याने तालुक्यातील ग्रामीण भागात 484 जणांनी आज गावागावात प्रवेश केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील जबाबदारी ग्रामपंचायतींवर असल्याने शासकीय इमारती संपल्यानंतर संस्थात्मक विलगीकरण करायचे कुठे? हा मोठा प्रश्न आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात पंचायत समिती, महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासन आपल्या परिने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांत तालुक्यात मोठय़ा संख्येने येत असलेल्या चाकमान्यांची माहिती घेऊन त्यांच्या गाडय़ा शहरात बिनधास्तपणे फिरत असल्याने पालिका प्रशासनाने तातडीने प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. मुंबईहून आलेल्या व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण कक्षात असताना त्यांच्या गाडय़ा शहरात फिरत असल्याने शहरवासीयांतून नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईतील व्यक्तींबरोबर या गाडय़ाही बंद ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
संस्थात्मक विलगीकरणावरून वाद नको - बीडिओ
परजिल्हय़ातून येणाऱया व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण त्या-त्या गावातील शाळा, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी करून ठेवण्यात येत असून प्राथमिक व माध्यमिक शाळांचे संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापक म्हणून संबंधित मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केले आहेत. सद्यस्थितीत बऱयाच गावात परजिल्हय़ातील व्यक्ती दाखल होऊन संबंधित गावातील शाळांमध्ये संस्थात्मक कक्षात क्वारंटाईनसाठी दाखल करून ठेवण्यात आले असून त्यामुळे काही गावात ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पुढे अशाप्रकारे ग्रामस्थांकडून विरोध झाल्यास आपत्ती व्यवस्थापक कायदा 2005 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी समज संबंधितांस देण्यात यावी. तरीही विरोध झाल्यास या कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा आशयाचे निर्देश गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना दिले आहेत.
चाकरमानीही आक्रमक
तालुक्यातील एका ग्रामीण भागात मुंबईहून थेट आलेल्या चारकमान्यांना त्यांच्या घरात जाण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. मेडिकल तपासणी आणि ग्रामपंचायतीच्या निर्देशानुसार संस्थात्मक विलगीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. मात्र, मुंबईकर चाकरमान्यांनी ग्रामस्थांच्या विरोधात आक्रमक होत संपूर्ण गावाच्या विरोधात भाष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे ग्रामपंचायतीने थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर चाकरमान्यांचा आवेश कमी होत गेला. ग्रामस्थांची माफी मागून ग्रामपंचायतीच्या निर्देशानुसार प्राथमिक शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण होण्यास चाकरमानी तयार झाले आणि दोन तास चाललेल्या वादावर पडदा पडला.
मालवणातून 211 मजूर गावाला रवाना
मालवण तालुक्यातील चिरेखाण, रस्ते कामगार व इतरत्र काम करणाऱया 211 परप्रांतीय मजुरांना 10 एसटी बसमधून गावी जाण्यासाठी ओरोस रेल्वे स्थानकावर नेऊन सोडण्यात आले. हे मजूर ओरोसहून मथुरा एक्सप्रेसने विजापूरला पाठविण्यात येणार आहेत. मालवण एसटी डेपोतून या मजुरांसाठी 10 बसेस सोडण्यात आल्या. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे, महसूल व एसटी कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी 307 मजुरांना एसटी बसने पाठविण्यात आले होते.
डायलेसीस कक्षाच्या निर्मितीस सुरुवात
मालवण ग्रामीण रुग्णालयात आठ महिन्यांपूर्वी येऊन पडलेल्या डायलेसीस युनिटच्या शुभारंभाचा मुहूर्त लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात यासाठी नवीन कक्षाची निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी खास ट्रेनिंगही घेतलेले आहे. मालवणकरांच्या सेवेत लवकरच डायलेसीस युनिट सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा असणे आवश्यक आहे, तरीही ही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही.