महाडमध्ये सेना-भाजप पुन्हा आमने-सामने
प्रतिनिधी/ महाड
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर महाडमध्ये शिवसैनिक संतप्त झाले. काही संतप्त शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱयांवर दगडफेक करीत आपल्या संतापाला वाट करून दिली. भाजपनेही पत्थर का जवाब पत्थर से देंगे.. मात्र आम्ही संयमी आहोत, अशा शब्दात इशारा दिला.
सोमवारी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर तालुक्यातील प. पु. गोळवलकर गुरुजी प्रकल्पात पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी 2.30 वा. झालेल्या कारवाईनंतर सायंकाळी 5 च्या दरम्यान त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे जनआशीर्वाद यात्रेला सध्या ‘बेक’ लागला. राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद मंगळवारी जिह्यात उमटले. चिपळुणात सेना-भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. चिपळुणात दोन ठिकाणी शिवसेनेकडून राणेंना रोखण्याचा प्रयत्न झाला. दगडफेकीचे प्रकार अन् बॅनरही फाडण्यात आले. झटापटी होत असतानाच पोलिसांनी कडे करत कार्यकर्त्याना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. या गोंधळामुळे तब्बल 4 तास चिपळूण तणावाखाली राहतानाच मुंबई-गोवा महामार्गही काही काळ बंद ठेवावा लागला.
दोन सोमवारी राणे लावणार हजेरी
रात्री पार पडलेल्या न्यायालयीन कामकाजानंतर महाडमध्ये 15 हजार रुपयांच्या जामिनावर नारायण राणे यांची मंगळवारी सुटका झाली. मात्र त्यांना 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर असे दोन दिवस रायगडात गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांना नारायण राणे यांच्या आवाजाचे नमुने सादर करावे लागणार आहेत. यापुढे भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची लेखी हमी न्यायालयाने नारायण राणे यांच्याकडून घेतली असून पुराव्यासोबत छेडछाड करायची नाही, असे कोर्टाने बजावले आहे. बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरदेखील महाडमध्ये दाखल झाले होते.