महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पाच बळी

10:14 PM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / इंफाळ

Advertisement

गेली दोन वर्षे अशांत असणाऱ्या मणिपूर या ईशान्य भारतातील राज्यात पुन्हा हिंसाचार भडकला आहे. अग्निबाणांच्या हल्ल्यात पाच नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. ही घटना शनिवारी राज्याच्या जिरीबाम भागात घडली. अग्निबाण डागण्यासाठी ड्रोन्सचा उपयोग करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मैतेयी समाज अधिक असणाऱ्या भागांमध्ये हे अग्निबाण हल्ले करण्यात आले आहेत.

Advertisement

शनिवारच्या हिंसाचारात राज्यातील बिष्णूपूर जिल्ह्यातील दोन भागांना लक्ष बनविण्यात आले होते. राज्यात अस्तित्वात असणाऱ्या फुटीरतावादी संघटनांकडून हा हिंसाचार घडविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या राज्याचे प्रथम मुख्यमंत्री मैरेमबाम कोईरेंग सिंग यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला आहे.                                      इतरत्र करण्यात आलेल्या अग्निबाण हल्ल्यांमध्ये एका वृद्धासह एकंदर पाच नागरिकांचा बळी गेला आहे. अग्निबाणांचा हल्ला होण्याचा प्रकार या राज्यात प्रथम घडला आहे. काही दिवसांपूर्वी याच जिरीबाम भागात ड्रोन हल्ला झाला होता.

दोन स्थानी हल्ले

शनिवारी दुपारी साडेतीनच्या आसपास जिरीबाम भागातील मोईरंग नगरात प्रथम हल्ला करण्यात आला. याच शहरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सिंग यांचे घर आहे. त्याला लक्ष्य बनविण्यात आले होते. पण ते चुकल्याने घराची हानी टळली. मात्र, घराजवळ असलेल्या एका 72 वर्षाच्या वृद्धाला प्राण गमवाले लागले. ट्रोंगलाओबी खेड्यातील दोन इमारतींवरही असेच हल्ले करण्यात आले. त्यामुळे या इमारतींमध्ये आग लागली होती. तथापि, सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. या खेड्यावर दोन अग्निबाण डागण्यात आले होते. दोन्ही ठिकाणच्या हल्ल्यांमध्ये आधुनिक स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता. अग्निबाणाच्या साहाय्याने हल्ला हा नवा प्रकार आहे. त्यामुळे काहीकाळ प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

सुरक्षेत वाढ

या घटनांच्या नंतर राज्यातील धोकाप्रवण भागांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बिष्णूपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्याची सीमारेषा बंद करण्यात आली आहे. काही भागांमध्ये इंटरनेटही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले. हिंसाचार आणखी वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. केंद्र सरकार या संदर्भात राज्य सरकारच्या संपर्कात असून आवश्यक ते सर्व साहाय्य देण्यात येईल, असे केंद्र सरकाराच्या गृह विभागाने स्पष्ट केले, अशी माहिती देण्यात आली.

सराव केला असणे शक्य

ड्रोन्स आणि अग्निबाणासारखी सामग्री या फुटीरतावादी संघटनांना मिळाली कशी, असाही प्रश्न उपस्थित झाला असून राज्य सरकार सावध झाले आहे. अशी अत्याधुनिक सामग्री फुटीरतावाद्यांकडे आढळल्याने या सर्व प्रकारामागे कोणत्या तरी विदेशी शक्तीचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच मणिपूरच्या डोंगराळ भागात हिंसाचाऱ्यांनी अग्निबाण डागण्याचा सराव केला असावा, असा संशय राज्याच्या पोलीस विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यकाळात देशाच्या अन्य भागांमध्येही अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने अग्निबाण निष्प्रभ करणारी यंत्रणा पाठविण्याचे ठरविले आहे.

राज्यातील शाळा बंद

गेल्या दोन आठवड्यांमध्ये अचानकपणे हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही भागांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मैतेयी समाजाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याने या समाजाकडून त्यांची बहुसंख्या असणाऱ्या भागांमध्ये ‘आणिबाणी’ लागू करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात मैतेयी आणि कुकी समाजांमध्ये संघर्ष होत आहे. मैतेयी हा बहुसंख्येने हिंदू असून कुकी समाज ख्रिश्चन आहे. सरकारी सवलतींवरुन हा संघर्ष होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article