महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री नीलेश काब्राल यांना मिळणार अर्धचंद्र

06:58 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पक्षश्रेष्ठींचा आदेश,मुख्यमंत्र्यांची चुप्पी

Advertisement

विशेष प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

सार्वजनिक बांधकाममंत्री आणि कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना अर्धचंद्र देण्याचा आदेश पक्षाने नवी दिल्लीहून दिला आहे. पुढील चार दिवसांमध्ये ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली जाणार आहे. सिक्वेरा यांच्या समावेशानंतर मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. याशिवाय आणखी दोन मंत्री रडारवर असून लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अद्याप तसे काही झालेले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना आलेक्स सिक्वेरा यांच्या समावेशाकरीता हटविण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला व तशी कल्पना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिली आहे. गोव्यात उद्यापासून इफ्फीला प्रारंभ होत असून मुख्यमंत्री आयोजनाच्या गडबडीत आहेत तर द्वितीय स्थानी असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे अद्याप गोव्यात पोहोचलेले नाहीत.

नीलेश काब्राल यांचा केंद्रस्थानी कोणीही गॉडफादर नसल्याने त्यांचा बळी दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात 325 पदे भरण्यावऊन जो वाद निर्माण झाला होता त्या संदर्भात भाजपच्याच काही आमदारांनी केंद्राकडे तक्रार मांडली होती. जी पदे भरण्यात आली त्यातील प्रत्येकी तीन पदे ही आमदारांनी निवडलेल्या व्यक्तींना देण्यात आली व त्यांची निवड करण्यात आली. इतर पदांचे पुढे काय? कोणी भरली ही पदे? यावऊन देखील भाजपमध्ये थोडाफार वाद निर्माण झाला होता.

काब्रालना हटविण्याचा निर्णय एक आठवडा अगोदर

प्राप्त माहितीनुसार, नीलेश काब्राल यांना हटविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी 10 - 12 दिवसांपूर्वीच घेतला होता व तशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली होती मात्र मध्यप्रदेशातील निवडणुका असल्याने ही प्रक्रिया नंतर करा अशी सूचनाही देण्यात आली होती. नीलेश काब्राल यांना देखील दोन दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी नवी दिल्लीत बोलाविले होते त्यानुसार ते दिल्लीत गेले असता पक्षासाठी त्याग करावा लागेल मात्र तुमच्याकडे अन्य कोणती तरी जबाबदारी देऊ असे सांगितले व मंत्रिमंडळातून तुम्हाला बाजूला व्हावे लागेल, असे कळविले.

त्यानंतर काब्राल हे गोव्यात पोहोचले व शुक्रवारी रात्री उशिरा काब्रालना हटविण्यात येणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सर्व वदंता असल्याचे म्हटले होते. शनिवारी सकाळी सर्व ठिकाणी काब्राल यांना हटविण्याबाबतच्या बातम्या पसरल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नेहमीच हसतमुख असणारे मुख्यमंत्री शनिवारी फार गंभीर दिसले व काब्रालना हटविण्याचा निर्णय झाला का? असे विचारता ज्यावेळी होईल त्यावेळी कळवू एवढेच ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालांना वेग आला आहे. नीलेश काब्राल हे एकाकी पडले असून त्यांची बाजू मांडण्यासाठी कोणीही आमदार पुढे आले नाहीत. यामुळेच काब्राल यांची गोची झाली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर खासदार व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे लक्ष ठेवून आहेत. ते सध्या तेलंगणामध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेलेले आहेत व ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संपर्कात आहेत. उद्या सोमवारी इफ्फी सुरू होत आहे. मंगळवारी सकाळी भारतीय पॅनोरमाचे उद्घाटन असल्याने मुख्यमंत्री फार कामात गर्क राहाणार आहेत. त्यामुळेच पुढील दोन दिवसांत मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार नाही. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, दि. 30 नोव्हेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका समाप्त होतील. दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. मतदान संपुष्टात आल्यानंतर कधीही आलेक्स सिक्वेरा यांचा शपथविधी होऊन ते मंत्रिमंडळात सहभागी होतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article