भीतीदायक सीरियल्स पाहण्याचा साइड इफेक्ट
ब्रिटनमध्ये वाढताहेत मनोरुग्ण, लोकांना भूतांची भीती : कोरोना महारीनंतर वाढली समस्या
कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यावर आता जगात मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. भूताची भीती सतावणाऱया लोकांची संख्या वाढली आहे. अशाप्रकारची चकित करणारी प्रकरणे ब्रिटनमधून समोर येत आहेत. अलिकडेच अशा लोकांवर करण्यात आलेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. लोक आता कोरोनातून बरे झाल्यावर अन्य आजारांना तोंड देत आहेत.
कोरोना संकटानंतर ब्रिटनमध्ये आता लोकांमध्ये असाधारण घडामोडी निदर्शनास आल्या आहेत. येथील जनता घोस्ट हंटर्सपासून डॉक्टरांची मदत घेत आहेत. तेथे लोक स्वतःच्या घरांमध्ये झोपेतून उठून बसतात, तेव्हा कुणाला मोठी वस्तू पडल्याचा आवाज ऐकू येत असतो. लोक घरांमध्ये साउंड डिटेक्ट डिव्हाइस आणि कॅमेरे बसवून घेत आहेत, जेणेकरून अशाप्रकारच्या घटनांना रिकॉर्ड करता येईल.
ब्रिटनमध्ये वैज्ञानिक स्वरुपात भूतांची ओळख पटविणाऱया घोस्ट हंटरची मागणी अचानक वाढली आहे. कोरोनानंतर सुरू झालेली ही समस्या आता राष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. कोरोना काळात लोकांनी रिकाम्या वेळेत भीतीदायक थ्रिलर सीरियल्स, सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनवर प्रसारित होणारे भीतीदायक कार्यक्रम पाहिले. मागील एक वर्षात 1 हजाराहून अधिक लोकांनी अचानक लाइट बंद होणे, रात्री अजब आवाज ऐकू येण्याच्या तक्रारी करत असल्याचे लंडनच्या गोल्ड स्मिथ युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक क्रिस्टोफर प्रेंच यांनी सांगितले आहे. अशाप्रकारच्या मनोरुग्णंमध्ये एंक्जाइटी, इंसोमनिया, डिप्रेशन आणि ओब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर यासारख्या समस्या दिसून येतात. लोकांमध्ये झोप न लागण्याची समस्या सर्वात अधिक दिसून येतेय. लोक नेहमीच कुठल्याही तरी विचारात हरवून काम करत आहेत. तसेच या लोकांमध्ये सदैव अस्वस्थपणाचा अनुभव असण्याची समस्याही समोर येत आहे.