भारत विरोधकांना बांगलादेशात कुठलेच स्थान नाही
शेख हसीना यांच्या मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : भारत हा बांगलादेशचा घनिष्ठ मित्र
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात उद्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक पूर्ण भारतीय उपखंडावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणर आहे. मतदानापूर्वी बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमान खान यांनी अवामी लीग जोपर्यंत सत्तेवर आहे तोवर बांगलादेशात भारतविरोधी घटकांना कुठलेच स्थान नसल्याचे शुक्रवारी म्हटले आहे. बांगलादेशातील चिनी गुंतवणुकीमुळे भारताने चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
भारत-बांगलादेश संबंधांची तुलना अन्य कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. हे संबंध आगामी दिवसांमध्ये आणखी मजबूत होणार आहेत. अवामी लीग सरकार मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीच्या बाजूने आहे. मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) पराभवाच्या भीतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याचे असदुज्जमान खान म्हणाले. अवामी लीगने अंतरिम सरकार स्थापन करत निवडणूक करविण्याच्या मागणीला नाकारले होते.
भारतविरोधकांचे उच्चाटन
बीएनपी आणि जमातने स्वत:च्या कार्यकाळादरम्यान भारताच्या ईशान्येच्या राज्यांमधील फुटिरवादी शक्तींना बांगलादेशात आश्रय दिला होता. परंतु आम्ही सत्तेवर आल्यास या फुटिरवादी संघटनांवर कठोर कारवाई केली आहे. अवामी लीग सत्तेवर असेपर्यंत बांगलादेश भारतविरोधी घटक, दहशतवादी आणि फुटिरवादी शक्तींना थारा देणार नाही. बीएनपी सत्तेवर येताच भारतासोबतचे संबंध बिघडतात आणि अल्पसंख्याकांना अत्याचारांना तोंड द्यावे लागत असल्याचा दावा खान यांनी केला आहे.
भारतासोबत विशेष संबंध
अवामी लीग सत्तेवर न राहिल्यास भारतासोबतचे संबंध प्रभावित होतील, भूतकाळात आम्ही याचा अनुभव घेतला आहे. भारत हा बांगलादेशसाठी एक विश्वासार्ह मित्र राहिला आहे. भारतासोबतचे आमचे संबंध विशेष आहेत. बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान भारताने बजावलेल्या भूमिकेचे आम्ही नेहमीच कौतुक करतो असे उद्गार खान यांनी काढले आहेत.