महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून

06:58 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्फराज खान, ध्रुव ज्युरेलला पदार्पणाची संधी, बेन स्टोक्सची ‘शतकी’ कसोटी
Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील धडाकेबाज कसोटी मालिकेचा तिसरा अध्याय आज गुरुवारपासून सुरू होणार असून त्यात भारताला अंदाज न बांधता येणाऱ्या इंग्लंडचा सामना करताना समान प्रमाणात निष्ठूरपणे आणि कुशलतेने वागण्याची आवश्यकता आहे. मालिकेतील हैदराबाद येथील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला धक्का दिल्यानंतर यजमानांनी पाच सामन्यांची मालिका बरोबरीत आणताना विझागमध्ये जोरदार पुनरागमन केले होते.

यशस्वी जैस्वाल (321 धावा) आणि जसप्रीत बुमराह (15 बळी) यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताला मालिकेत पुनरागमन करता आले, पण मधल्या फळीच्या खराब कामगिरीविषयीच्या चिंता कायम आहेत. मधली फळी आता युवा प्रतिभेवर अवलंबून असेल. कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीतील फॉर्ममुळे भारतीय फलंदाजीबद्दलची चिंता आणखी वाढली आहे. या सामन्यात के. एल. राहुलविना भारताला उतरावे लागणार आहे, तर संपूर्ण मालिकेत विराट कोहलीचा आधार मिळणार नाही.

गेल्या एक वर्षात रोहितने आक्रमक पद्धतीने केलेली फलंदाजी त्याला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकलेली नाही आणि सध्याची परिस्थिती पाहता भारतीय कर्णधाराने बदल करण्याची गरज आहे. तिसऱ्या कसोटीसाठी राहुलच्या अनुपलब्धतेमुळे मुंबईचा फलंदाज सर्फराज खानचे कसोटीत पदार्पण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशांतर्गत स्पर्धांत भरपूर धावा जमविलेला सर्फराज फलंदाजीतील मधल्या फळीतील प्रतिष्ठेच्या दोन स्थानांवर एक कसोटी खेळलेल्या रजत पाटीदारसमवेत खेळू शकतो.

ज्युरेलला संधी मिळणार

मधल्या फळीतील भारताचा अननुभव इंग्लिश गोटाने निश्चितच लक्षात घेतलेला असेल. त्यांचे प्रतिस्पर्ध्यांविषयी सखोल संशोधन आणि आक्रमक खेळाचे परिणाम वेळोवेळी दिसून आले आहेत. यष्टिरक्षक के. एस. भरत फलंदाजीत सतत अपयशी ठरल्यामुळे संघ उत्तर प्रदेशच्या 23 वर्षीय ध्रुव ज्युरेलकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 46.47 च्या सरासरीने धावा जमवून ज्युरेलने चांगली छाप उमटविलेली आहे. राजकोट येथील खेळपट्टी मोठ्या प्रमाणात फिरकीस पोषक ठरण्याची शक्यता नसल्यामुळे येथील पदार्पण ज्युरेलला क्रिकेटच्या अव्वल जगात धडाक्यात प्रवेश करण्याच्या दृष्टीने मदतकारी ठरू शकते.

 

स्थानिक नायक चेतेश्वर पुजारा निवड समितीच्या योजनांमध्ये आता नसल्यामुळे स्थानिक नायक रवींद्र जडेजाकडून पुन्हा मैदानात उतरून भारताला मदत केली जाण्याची अपेक्षा असेल. त्याच्या फिरकीला पहिल्या दोन कसोटीत इंग्लंड चोख उत्तर देऊ शकलेला नाही. इंग्लंडच्या (33.90) तुलनेत भारताच्या फिरकीपटूंची सरासरी एकत्रितपणे (38.39) अशी सर्वसाधारण असली, तरी भारतीय संघव्यवस्थापन त्याबद्दल जास्त काळजी करणार नाही.

या मालिकेत भारतासाठी सुदैवाने बुमराह त्याच्या उत्कृष्ट फॉर्मात राहिलेला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने चांगली कामगिरी केल्यामुळे काही प्रमाणात नामांकित फिरकीपटूंच्या अपयशावर पडदा पडलेला आहे. फिरकीस खूप पोषक खेळपट्ट्यांच्या अनुपस्थितीत त्यांना फारशी मजल मारता आलेली नाही. राजकोटची खेळपट्टी फलंदाजांसाठी पारंपरिकपणे अनुकूल राहिलेली असल्याने, भारताला चायनामन तज्ञ कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. अक्षर पटेलला फलंदाजीतील कौशल्याचा विचार करून पसंती मिळू शकते.

अश्विन 500 बळींचा टप्पा गाठणार

499 बळी मिळविलेला भारताचा प्रमुख फिरकीपटू आर. अश्विन या सामन्यातून 500 बळी मिळविलेल्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. इंग्लंडने भारतात आतापर्यंत योग्य पावले उचलली आहेत. फिरकीपटू टॉम हार्टलेचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला आहे. त्याच्या अचूक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांवर सतत दबाव टाकलेला आहे आणि फलंदाजीत त्याचा दिसून आलेला आक्रमक दृष्टिकोन संघाच्या तत्त्वज्ञानाशी मिळता जुळता राहिलेला आहे. जॅक लीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यामुळे इंग्लंडकडे ज्यो रुटकडे झुकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही त्याच्याकडून फलंदाजीतही सातत्य दाखविले जाण्याची अपेक्षा आहे. ऑली पोपने हैदराबाद येथे इंग्लंडचा विजय निश्चित करताना कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी केली. परंतु दुसऱ्या कसोटीतील दुहेरी अपयशामुळे त्याच्यावर तसेच जॉनी बेअरस्टोवर लक्ष केंद्रीत राहील. ही कर्णधार बेन स्टोक्सची 100 वी कसोटी असून विजयाने हा टप्पा साजरा करण्याचा त्याचा मनसुबा राहील.

संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, के. एस. भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गुस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ज्यो रूट, मार्क वूड.

वेळ: सकाळी 9:30 वा., थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स 18 नेटवर्क, जिओ सिनेमा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article