भारतीय स्मार्टफोन विक्री 10 टक्के घटली
सप्टेंबर तिमाहीमधील आकडेवारीचा समावेश : आयडीसीच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2022 च्या तिसऱया तिमाहीत देशातील स्मार्टफोन विक्री 10 टक्क्यांनी घसरून 4.3 कोटी युनिटवर आली आहे. मार्केट रिसर्च कंपनी इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या मते, गेल्या तीन वर्षातील भारतीय स्मार्टफोन मार्केटमधील विक्रीची ही सर्वात कमी संख्या राहिली असल्याची माहिती आहे.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत, एकूण स्मार्टफोन विक्रीमध्ये 5 जी स्मार्टफोनचा वाटा 36 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये, गेल्या तिमाहीत 5 जी स्मार्टफोनचे सरासरी विक्री मूल्य प्रति स्मार्टफोन 393 डॉलर (सुमारे 32,000रुपये) पर्यंत वाढले आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 377 डॉलर (सुमारे 30,600 हजार रुपये) होते.
आयडीसीने तिमाही आधारावर आपल्या जागतिक अहवालात म्हटले आहे की, ‘भारताच्या स्मार्टफोनची विक्री सप्टेंबरच्या तिमाहीत वार्षिक 10 टक्क्यांनी घटून 4.3 कोटी युनिट्सवर आली आहे.
दिवाळी आणि सण असूनही 2019 नंतर कोणत्याही तिसऱया तिमाहीतील ही सर्वात कमी विक्री होती, असे अहवालात म्हटले आहे. कमी मागणी आणि स्मार्टफोनच्या वाढत्या किमतींचा फोन खरेदीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.’
अहवालानुसार, सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वर्चस्व कायम राहील. त्यांनी एकूण स्मार्टफोन विक्रीत विक्रमी 58 टक्के वाटा मिळवला. तथापि, ऑनलाइनवरील स्मार्टफोनची विक्री वर्षभराच्या आधारावर 2.5 कोटी युनिट्सवर स्थिर राहिली होती.
मीडिया टेक प्रोसेसरवर आधारित स्मार्टफोन्सचा एकूण बाजारातील हिस्सा 47 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर क्वालकॉमच्या युनिस्को स्मार्टफोनचा हिस्सा 15 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर घसरला आहे. शाओमीने या तिमाहीत 21.2 टक्के वाटय़ासह सर्वाधिक स्मार्टफोन विकले. त्याच वेळी, ऍपल 63 टक्केसह प्रीमियम श्रेणीत पुढे राहिली आहे.