भारतीय सैनिकांसाठी विशेष तयारी
पोर्टेबल घर अन् तलावांची व्यवस्था : चीन सीमेवर मोठय़ा संख्येत सैनिक तैनात
वृत्तसंस्था /लेह
चीनच्या कुठल्याही प्रकारच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याचे हजारो सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहेत. हिवाळय़ात पूर्व लडाखमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याने सैनिकांसाठी विशेष पावले उचलली जात आहेत. सीमेवर तैनात जवानांना पाण्याचा पुरवठा करण्यासठी सैन्याने मोठे पाऊल उचलले आहे. सैन्याकडून या भागात आता मोठय़ा संख्येत तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. सैन्याने कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळावा म्हणून पोर्टेबल घरांचीही निर्मिती केली आहे.
पूर्व लडाखमध्ये चिनी आगळीकीला हाणून पाडण्यासाठी भारताने 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. सीमेवर तैनात सैनिकांना रसद पुरवठा करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. तैनात सैनिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी मोठय़ा संख्येत तलावांची निर्मिती करत आहोत. दौलत बेग ओल्डी सारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत देखील तलावांच्या पाण्याचा वापर करता येणार असल्याचे सैन्याचे इंजिनियर इन चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी सांगितले आहे.
अत्याधिक थंडीत पृष्ठभागावरील पाणी गोठून जाते आणि चहुबाजूला बर्फ जमा होतो. परंतु त्याखाली पाणी द्रवस्वरुपात उपलब्ध असते. आमच्या सैनिकांनी स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी या तलावांमधील पाण्याचा वापर केला आहे. दौलत बेग ओल्डी हे लडाखमधील सर्वात थंड ठिकाण मानले जाते असे त्यांनी म्हटले आहे.
या भागांमध्ये तापमान काही ठिकाणी शून्याच्या खाली उणे 40 अंशापर्यंत पोहोचते. या ठिकाणी स्वतःच्या सैनिकांसाठी ताजे पाणी अन् भोजन उपलब्ध करविणे आव्हानात्मक असते. सैन्याच्या इंजिनियर्सनी सैनिकांना चीन सीमेनजीक तैनात राहण्यास मदत करण्यासाठी आणि तेथे वास्तव्याची स्थिती अनुकूल करण्यासाठी व्यापक कार्य केल्याचे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी सांगितले आहे.
पूर्व लडाखमध्ये सैनिकांसाठी आतापर्यंत 22 हजार अतिरिक्त वास्तव्यसुविधांची निर्मिती केली आहे. या इमारतींना एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेता येईल आणि गरज भासल्यास विशिष्ट क्षेत्रांमध्ये स्थानांतरित करता येईल अशाप्रकारची त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.