भारतीय युवा संघ अंतिम फेरीत
कर्णधार उदय सहारन सामनावीर, सचिन धसचे शतक चार धावांनी हुकले
वृत्तसंस्था/ बेनोनी
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांच्या समयोचित दीडशतकी भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. कर्णधार सहारनने 124 चेंडूत 6 चौकारांसह 81 तर सचिन धसने 95 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 96 धावा झळकाविल्या. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 171 धावांची भागिदारी केली, जी भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरली.
यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 7 बाद 244 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 48.5 षटकात 8 बाद 248 धावा जमवित हा सामना 7 चेंडू बाकी ठेऊन जिंकला.
दक्षिण आफ्रिकेच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर माफेकाने आदर्श सिंगला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या लुसने आर्शिन कुलकर्णी आणि मुशीर खान यांना बाद करत भारतावर मोठे दडपण आणले. लुसने मुशीर खानला 4 धावावर तर कुलकर्णीला 12 धावावर झेलबाद केले. लुसने भारताला आणखी एक धक्का देताना मोलियाला 5 धावावर झेलबाद केले. भारताची यावेळी स्थिती 11.2 षटकात 4 बाद 32 अशी केविलवाणी झाली होती. पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात भारताने 26 धावा जमविताना 3 गडी गमाविले.
कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी आफ्रिकेच्या भेदक माऱ्याचा समर्थपणे मुकाबला करीत संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 171 धावांची भागिदारी केली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 65 चेंडूत, शतकी भागिदारी 113 चेंडूत तर दीडशतकी भागिदारी 202 चेंडूत नोंदविली. धासने आपले अर्धशतक 47 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने तर साहरनने अर्धशतक 88 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने झळकवले. दक्षिण आफ्रिकेला भारताची ही जोडी फोडण्यात 43 व्या षटकात यश मिळाले. माफेकाने धसला झेलबाद केले. भारताला यावेळी विजयासाठी 41 धावांची गरज होती. माफेकाने भारताला आणखी एक धक्का देताना अविनाशला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 10 धावा जमविल्या. अभिषेक चोरटी धाव घेण्याच्या नादात आपले खाते उघडण्यापूर्वीच धावचीत झाला. कर्णधार सहारन 49 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजयी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. तो बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ एका धावेची गरज होती. लिंबानीने विजयी चौकार ठोकून दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आणले. लिंबानीने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 13 धावा जमविल्या. भारताच्या डावात अवांतराच्या रुपात 27 धावा मिळाल्या. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे माफेका आणि लुस यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सावध सुरूवात झाली. सलामीच्या प्रिटोरीयसने 102 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 76 धावा झळकविल्या. स्टॉल्कने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 चेंडूत 14 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला टीगेर आपले खाते उघडू शकला नाही. प्रिटोरीयस आणि सिलेटवेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केली. सिलेटवेनने 100 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 64 धावा जमविल्या. विटहेडने 4 चौकारांसह 22, कर्णधार जेम्सने 1 षटकार आणि 1 चौकारासह 24 तसेच लूसने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 23 धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 9 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे राज लिंबानी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 60 धावात 3 तर मुशीर खानने 43 धावात 2 तसेच सौमी पांडेने 38 धावात 1 गडी बाद केला.
या स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत पाच वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने यावेळी आपली सलग विजयी घोडदौड कायम राखत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. 2014 साली दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 50 षटकात 7 बाद 244 (प्रिटोरीयस 76, स्टोल्क 14, सिलेटवेन 64, विटहेड 22, जेम्स 24, लुस नाबाद 23, अवांतर 11, लिंबानी 3-60, मुशीर खान 2-43, पांडे 1-38), भारत 48.5 षटकात 8 बाद 248 (उदय सहारन 81, सचिन धस 96, लिंबानी नाबाद 13, अविनाश 10, कुलकर्णी 12, अवांतर 27, माफेका 3-32, लुस 3-37).