भारतीय महिला तिरंदाज संघाचे स्वप्न अधुरे
वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)
जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पात्रतेचे स्वप्न भारतीय महिला रिकर्व्ह तिरंदाज संघाचे संपुष्टात आले. येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या शेवटच्या विश्व कोटा तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात दीपिकाकुमारीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला रिकर्व्ह संघाला दुसऱ्या फेरीतच युक्रेनकडून पराभव पत्करावा लागला.
दीपिकाकुमारी, भजन कौर आणि अंकिता भक्त यांचा सहभाग असलेल्या भारतीय महिला रिकर्व्ह संघाला युक्रेनच्या महिला संघाकडून राऊंड-16 फेरीच्या लढतीत 3-5 असा पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे युक्रेनच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार आपले स्थान निश्चित केले. युक्रेनच्या महिला रिकर्व्ह संघाने अँटेलियाच्या या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. 2024 च्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या स्टेज-2 मध्ये भारतीय रिकर्व्ह तिरंदाजपटूंचे आव्हान संपुष्टात आले. आता रिकर्व्ह वैयक्तिक फेरीमध्ये भारतीय महिला तिरंदाजपटूंना कोटा पद्धतीनुसार ऑलिम्पिक पात्रतेची संधी मिळू शकेल. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आता भारताची एकमेव महिला तिरंदाजपटू दीपिकाकुमारीला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदकासाठीच्या लढतीत मेक्सिकोच्या व्हॅलेन्सियाकडून हार पत्करावी लागली. व्हॅलेन्सियाने दीपिकाकुमारीचा 6-4 असा पराभव केला.