भारतीय खलाशांची यशस्वीपणे सुटका
अपहरण झालेल्या नौकेवर उतरले नौदल सैनिक : चाच्यांशी संघर्ष, मोहीम फत्ते
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लायबेरिया देशाच्या अपहृत एमव्ही लिला नॉरफोक नामक एका व्यापारी नौकेवर भारताचे नौसैनिक उतरल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सर्व खलाशांची यशस्वीपणे सुटका करण्यात आली. खलाशांच्या सुटकेसाठी नौदलाच्या मार्कोस कमांडोंच्या मदतीने विशेष अभियान राबवण्यात आले. अपहृत जहाजामध्ये 15 भारतीयांसह एकूण 21 खलाशी होते.
एमव्ही लिला नॉरफोक नामक एका व्यापारी या नौकेचे अपहरण गुरुवारी संध्याकाळी झाले होते. या नौकेवर 15 भारतीय खलाशी होते. भारतीय नौदलाने अपहरणाचे वृत्त समजताच आपली युद्धनौका खलाशांच्या संरक्षणासाठी पाठविली. या नौकेवरील हेलिकॉप्टर्समधून भारताचे नौसैनिक शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता या नौकेवर उतरले. भारतीय नौसैनिकांनी चाच्यांना अंतिम इशारा देत शरण येण्याचे आवाहन केले. त्यानंतर अवघ्या दोन-अडीच तासात नौदलाने मोहीम फत्ते केली.
ज्या समुद्री चाच्यांनी या नौकेचे अपहरण केले होते, त्यांच्याशी नौसैनिकांचा जोरदार संघर्ष झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, यासंबंधी तातडीने सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सर्व खलाशांची सुटका झाल्यानंतर आता व्यापारी नौकेचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही व्यापारी नौका कोठून कोठे जात होती, यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती हाती लागलेली नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे. तथापि, ती भारताशी संबंधित नसल्याचे समजते. मात्र, या नौकेवर भारतीय खलाशी असल्याने भारताने त्वरित कृती करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
पोर्टलवरुन माहिती
गुरुवारी संध्याकाळी या अपहरणाचे वृत्त भारतीय नौदलाला युकेएमटीओ पोर्टलवरून समजले. पाच ते सहा समुद्री चाचे या व्यापारी नौकेवर चढले आणि त्यांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर त्वरित नौदलाने हालचाल करत या नौकेचा पाठलाग केला. शुक्रवारी सकाळी भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी या अपहृत नौकेशी संपर्क करण्यात यश मिळविले. सर्व भारतीय खलाशी सुखरुप असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
हुती संघटनेचा हात
येमेन या देशातील हुती या दहशतवादी संघटनेने गेल्या महिन्याभरात तांबडा समुद्र आणि अरबी समुद्रात अनेक व्यापारी नौकांवर हल्ला केलेला आहे. एका महिन्यात अशा 25 घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ला झालेल्यांमध्ये भारतीय नौकांसह अमेरिका आणि अन्य देशांच्या नौकाही आहेत. हुती संघटनेला इराणचे समर्थन असल्याचा आरोप आहे. ताज्या घटनेतही हुतीचा हात असल्याचे बोलले जात आहे. तथापि, या संघटनेने अधिकृतरित्या जबाबदारी स्वीकारलेली नाही.
भारतीय युद्धनौकांची गस्त
तांबडा समुद्र आणि अरबी समुद्र या भागात भारताने व्यापारी नौकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या नौदलाच्या युद्धनौका नियुक्त केल्या होत्या. या नौकांनी आता गस्त वाढविली आहे. गेल्या चार ते पाच आठवड्यांमध्ये समुद्री चाचेगिरी आणि नौका अपहरणाच्या घटना अनेकदा घडल्याने दक्षता घेण्यात येत आहे.
सामूहिक कृतीत सहभाग नाही
अमेरिका व अन्य काही देशांनी व्यापारी नौकांच्या संरक्षणासाठी संयुक्तरित्या संरक्षक नौदलाची उभारणी केली आहे. तथापि, भारत अशा संयुक्त कृतीदलांचा भाग अद्याप बनलेला नाही. भारत स्वबळावर नौकांचे संरक्षण करीत आहे. भविष्यकाळात या सामूहिक प्रयत्नांमध्ये भारताचाही समावेश केला जाऊ शकतो.
अमेरिकेचा हुतीला निर्वाणीचा इशारा
तांबड्या समुद्रात तसेच अरबी समुद्राच्या उत्तरेच्या भागात सध्या सोमालियात वास्तव्यास असणाऱ्या हुती या दहशतवादी संघटनेच्या चाचेगिरीचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठाच परिणाम होत आहे. अमेरिकेने आता हुती या संघटनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर व्यापारी नौकांवरील हल्ले थांबले नाहीत, तर हुती संघटनेविरोधात कठोर सैनिकी कारवाई करण्यात येईल, असे अमेरिका आणि तिच्या अन्य 11 मित्र देशांनी स्पष्ट केले आहे. हा अंतिम इशारा असून यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता हुतीची स्थाने उद्ध्वस्त करण्यात येतील, असे अमेरिकेच्या नौदलाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.