भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
बेन स्टोक्सच कर्णधार : तीन नव्या चेहऱ्यांना संधी : ईसीबीकडून 16 सदस्यीय संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. उभय संघातील ही मालिका येत्या 25 जानेवारीपासून भारतात खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, बेन स्टोक्सकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून अष्टपैलू सॅम करन आणि स्टार फलंदाज जोस बटलर यांना या संघात स्थान मिळालेले नाही. तसेच तीन नव्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. ईसीबीने सोमवारी 16 सदस्यीय संघ जाहीर केला.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने तीन नवे चेहरे मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शोएब बशीर, टॉम हार्टले आणि गस अॅटकिन्सन यांचा समावेश आहे. याचबरोबर भारतातील फिरकी खेळपट्ट्या पाहता इंग्लंडने टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद या फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, ओली पोप दुखापतीनंतर संघात परतला आहे. तर ख्रिस वोक्स, लियाम डॉसन आणि विल जॅक्स या तिघांना निवड समितीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
अनुभवी जेम्स अँडरसन, मार्क वूड, ऑली रॉबिन्सन आणि अॅटकिन्सन हे चार वेगवान गोलंदाजीचे पर्याय इंग्लंडकडे आहेत. दुसरीकडे अनुभवी बेन स्टोक्सकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे. दरम्यान, या मालिकेत बेन स्टोक्स गोलंदाजी करू शकणार की फक्त फलंदाज म्हणून खेळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या महिन्यात त्याच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. इंग्लंडकडे जॉनी बेअरस्टो आणि बेन फोक्स हे दोन विकेटकीपिंगचे पर्याय आहेत.
जानेवारी महिन्यात इंग्लिश संघ पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. उभय संघातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी ही मालिका अंत्यत महत्वाची असणार आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रुट आणि मार्क वूड.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- पहिली कसोटी - भारत वि इंग्लंड, 25 ते 29 जानेवारी, हैदराबाद
- दुसरी कसोटी - भारत वि इंग्लंड, 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
- तिसरी कसोटी - भारत वि इंग्लंड, 15 ते 19 फेब्रुवारी, राजकोट
- चौथी कसोटी - भारत वि इंग्लंड, 23 ते 27 फेब्रुवारी, रांची
- पाचवी कसोटी - भारत वि इंग्लंड, 7 ते 11 मार्च, धरमशाला