भारताला मिळणार स्वस्त इंधन तेल ?
युक्रेन युद्धामुळे जगाची समीकरणे बदलणे शक्य, रशियाही समझोत्यास तयार होण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आजही सुरुच आहे. मात्र, ते थांबण्याचीही शक्यता निर्माण झाली असून दोन्ही देश शांतता बोलण्यांमधून तोडगा काढतील असे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे भारत आणि रशिया यांच्यात 30 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करण्याचा करार करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे भारताला कच्च्या इंधन तेलाचा पुरवठा सुरळीत होऊन पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरील दबाव कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
युद्धमान रशियाने भारत तसेच इतर मित्र देशांसमोर तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याचा लाभ भारताने उठविल्याचे दिसून येते. अमेरिकेने यावर प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली असली तरी अमेरिका फार कठोर भूमिका घेणार नाही, असा तज्ञांचा कयास आहे. भारत रशियाकडून घेणार असलेल्या तेलावर दरात मोठय़ा प्रमाणात सवलत मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. इंडियन ऑईल या भारतीय तेल कंपनीने रशियाकडे ऑर्डर बुक केली आहे. त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियमनेही 20 लाख बॅरल तेल आयात करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे.
भारताच्या संपर्कात
रशियाकडून स्वस्तात तेल मिळविण्यास अमेरिकेचा विरोध नाही. मात्र युपेनवर रशियाने हल्ला केला आहे. अशा स्थितीत भारत कोणाच्या बाजूने उभा राहणार, हे त्याने निश्चित करण्याची वेळ आली आहे. भारताच्या अधिकाऱयांशी अमेरिका संपर्कात असून भारताला अमेरिकेची बाजू सांगण्यात येत आहे.
परत आणण्याची प्रकिया अद्यापही
युक्रेनमध्ये अडकलेल्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया अद्यापही सुरु आहे अशी माहिती भारताच्या विदेश विभागाने दिली. आतापर्यंत 22,500 नागरीकांना परत आणण्यात आले आहे. मात्र, काहीजण परत येण्यास नकार देत आहेत. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 15 ते 20 आणखी नागरीक येण्यात तयार झाले आहे. त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.
रशियावर आरोप
रशिया युपेनशी चर्चा करण्याचे ढोंग करीत आहे, असा आरोप फ्रान्सने केला आहे. दुसरीकडे रशियाशी लागून असलेल्या देशांनी आपली संरक्षणव्यवस्था बळकट करण्यास प्रारंभ केला असून पोलंडने ब्रिटनकडून क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेण्याचा विचार चालविला आहे. तर अमेरिका युक्रेनला 8 कोटी डॉलर्सचे शस्त्रसाहाय्य देणार आहे. या युद्धामुळे अनेक युरोपियन देशांनी अमेरिकेकडून शस्त्र खरेदी वाढविल्याने अमेरिकेचा मोठाच लाभ होईल अशीही चर्चा आहे. विशेषतः अमेरिकेच्या ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांना युरोपियन देशांकडून अधिक मागणी मिळत आहे.
चीनचे विदेशमंत्री भारतात येणार ?
चीनचे विदेश मंत्री भारतात येऊ इच्छित आहेत. तसा प्रस्ताव चीनने भारताकडे ठेवला होता. मात्र अद्याप भारताने त्यावर निर्णय घेतलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, वांग यी भारतात आल्यास ती एक महत्वाची घटना ठरणार आहे. गेली जवळपास दोन वर्षे भारत आणि चीन यांच्या सेना लडाख सीमेवर एकमेकींच्या समोरासमोर उभ्या आहेत. ही स्थिती निवळण्यासाठी वांग यी यांची भेट साहाय्यभूत होणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
अर्थव्यवस्था मंदावणार युक्रेन युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था किमान 1 टक्क्याने मंदावणार आहे. रशियन आक्रमणाच्या पहिल्या वर्षात हा परिणाम दिसून येईल. युद्ध लवकर थांबले नाही तर पुढच्या आर्थिक वर्षातही ही मंदी सुरु राहील अशी शक्यता व्यक्त होत असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा कितपत परिणाम होईल, यावर भारतातही चर्चा सुरु झाली आहे. भारताचा या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही.