भारताच्या ‘मेटा’ प्रमुखपदी गेमिंग तज्ञ संध्या देवनाथन
मोठी जबाबदारी मिळाली : 1 जानेवारी 2023 पासून सांभाळणार कार्यभार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मेटा कंपनीच्या भारतीय प्रमुखपदी संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित मोहन यांनी यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांची जागा त्या घेतील.
फेसबुक ही मूळ कंपनी असून तिचे नवे नाव मेटा आहे. मेटाने संध्या देवनाथन यांची भारतासाठी नवीन प्रमुख आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. संध्या आता अजित मोहन यांची जागा घेणार आहेत. संध्या देवनाथन 1 जानेवारी 2023 पासून नवे पद स्वीकारणार असल्याची माहिती आहे आणि यापुढे डॅन नेरी यांना अहवाल देतील. अजित मोहन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला आहे. संध्या यांना गेमिंग एक्स्पर्ट मानले जाते आणि त्या महिलांना गेमिंग उद्योगात येण्यासाठी प्रेरित करतात, असेही समजते.
मिळालेल्या माहितीनुसार अजित मोहन स्नॅपचॅटमध्ये सहभागी होणार आहेत. अजित मोहन यांनी फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जानेवारी 2019 मध्ये पदभार स्वीकारला. देवनाथन 2016 पासून फेसबुकसोबत आहेत आणि सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये कंपनीचा व्यवसाय वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
2020 मध्ये, संध्या देवनाथन यांनी एपीएएसी क्षेत्रासाठी गेमिंगचे नेतृत्व केले. देवनाथन प्ले फॉरवर्डसाठी ग्लोबल लीडरदेखील आहेत. यायोगे गेमिंगमध्ये मोठा वाटा उचलण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.
मेटाने अलीकडेच 11,000 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. टाळेबंदीची घोषणा करताना, मेटा सीईओ आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणाले की मेटाच्या इतिहासातील हा सर्वात कठीण बदल होता. या कारवाईबद्दल त्यांनी कर्मचाऱयांची माफीही मागितली. कमी होत असलेला महसूल आणि तंत्रज्ञान उद्योगातील सध्या सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे झुकरबर्ग यांनी कर्मचाऱयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.