भविष्य
करणीबाधा डोक्मयातून काढा
15. 12. ते 21.12. 2021
‘गेल्या दोन वर्षात होत्याचं नव्हतं झालं बघा गुरुजी. तीन ऍक्सिडेंट झाले. धंदा एवढा चांगला चालत होता तो पण बसला. घरातलं आजारपण जाईना. एक बरा झाला की दुसरा आजारी. मला पहिल्यापासूनच शंका होती. त्यात आणि गावाकडच्या अमुक अमुक ज्योतिषानं पण सांगितलं की, तुमच्या भावकीतच कुणीतरी करणी केले....’ समोरच्या बाई सांगत होत्या. मी शांतपणे ऐकत होतो. हे शब्द मला नवीन नव्हते.
पराशक्तीला, गुरुंना आणि वाचकांना सविनय सादर नमस्कार. आपल्या समाजाला (इथे समाज म्हणजे सगळे आले. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व अन्य) लागलेली सगळय़ात भयानक कीड जर कुठली असेल तर करणी, बाधा, कोरव बांधणे, उतारा, एखाद्याच्या नावाने लिंबू फेकणे, खाऊ घालणे इ. प्रकार आणि त्यामागची मानसिकता. आजच्या लेखात याच विषयावर लिहिणार आहे.
हे प्रकार फक्त आपल्या संस्कृतीत आहेत काय? तर नाही. जगाच्या पाठीवर जिथे जिथे संस्कृती विकसित झाली तिथे तिथे हे प्रकार आहेत. चीन, जपान या पूर्वेकडच्या देशांपासून पार पश्चिमेच्या अमेरिका, कॅनडापर्यंत काळी जादू बघायला मिळते. तिथे याला ‘वुडू,’ ‘हुडू,’ ‘विचक्राफ्ट,’ ‘ब्लॅक शमनिसम’ म्हणतात. इस्लाममध्ये ‘इल्म-अल-सिंहर,’ ‘अमलियात’ वगैरे नावे आहेत.
आता कळीचा मुद्दा हा की हे सगळे प्रकार खरे आहेत का? कुणीतरी कोणावर असे प्रयोग करून बरबाद करू शकतो का? दर अमावास्या, पौर्णिमेला, ग्रहण झाल्यावर चौका चौकात किंवा 3 रस्ते मिळतात (तिकाटा!) तिथे लिंबू, बाहुल्या, नारळ, शेंदूर लावलेला कोहाळा, पाळणा का पडतात? आणि याला काही तोड आहे का?
या सगळय़ा प्रश्नांची उत्तरे तर देणारच आहे. पण त्या अगोदर हे प्रकार काय आहेत, ते कसे करतात हे जाणून घेऊया.
तंत्रशास्त्रात अनेक संप्रदाय आहेत. दुर्दैवाने तंत्रशास्त्र बदनाम झाले आहे ही गोष्ट वेगळी. पण या सगळय़ा साधनांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे नटकर्म. नट म्हणजे सहा आणि कर्म म्हणजे काम किंवा क्रिया. तर ही सहा कर्मे कुठली तर 1. शांतीकर्म, 2.आकर्षण-वशीकरण, 3. विद्वेशण, 4. स्तंभव, 5. उच्चाटन, 6. मारण.
शांतीकर्म म्हणजे एखाद्या संकटाला, आपदेला शांत करणे. यात ग्रहांच्या शांत्या वगैरे गोष्टी आल्या. आकर्षण म्हणजे आकर्षित करणे. सभा आकर्षण वगैरे, वशीकरण (याचा सगळय़ात जास्त धंदा चालला आहे). म्हणजे एखाद्याला आपल्या ताब्यात ठेवणे. विद्वेषण म्हणजे दोन व्यक्तींमध्ये भांडणे लावणे, उच्चाटनात एखाद्या व्यक्तीला गाव, घर सोडायचा प्रयत्न असतो आणि मारण म्हणजे एखाद्याला जीवे मारणे.
इतके जाणून घेतल्यावर तुमच्या मनात प्रश्न नाही का आला की जर असे करता येते तर एखाद्या तांत्रिकाने सिनेमाच्या हिरोईनला का नाही वश केले? शत्रू राष्ट्राच्या सैन्याला का नाही मारले? इतक्मया बाता मारणारा चार पैशासाठी का तरसतोय? सध्या इथे थांबतो. पुढच्या भागात सविस्तर उत्तरे देतो.
महाउपाय-नवरा बायकोमध्ये जास्त भांडणे होत असल्यास सिद्ध केलेला गौरीशंकर रुद्राक्ष (जोड रुद्राक्ष) घालावा.
सोपी वास्तू टीप- देवघरात भरमसाठ फोटो, मूर्ती ठेवण्यापेक्षा कमीत कमी फोटो आणि मूर्ती ठेवून स्वच्छ मनाने नेटकी पूजा करावी.
मेष
आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्ष करून चालणार नाही. मूळचा आक्रमक स्वभाव अधिक आक्रमक होणार नाही याची काळजी घ्या. स्थावर मालमत्तेपासून फायदा होईल. संततीविषयक चिंता वाटेल. पैशांच्या बाबतीत संमिश्र ग्रहमान. मित्र तुमच्या दिलफेक स्वभावाचा फायदा घेतील.
उपाय/उपासनाः मंदिरात दूध दान करा. सावध रहाः बुधवार, शुभ अंकः 7, शुभ रंगः हलका पिवळा.
वृषभ
भावकीतल्या प्रॉपर्टीच्या वादावर तोडगा निघेल. नवीन वाहन घेण्याची योजना आखाल. मनोरंजन आणि करमणुकीकडे कल असेल. संततीसंबंधी चिंता दूर होईल. नोकरी व्यवसाय यातून चांगली अर्थप्राप्ती, वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
उपाय/उपासनाः शिवमंदिरात दीपदान करा. सावध रहाः गुरुवार, शुभ अंकः 5, शुभ रंगः काळा.
मिथुन
दुसऱयाची काळजी करणे हा तुमचा स्वभाव आहे. पण काळजी करण्याने तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक वादविवादापासून दूर रहा. प्रसिद्धीचे योग आहेत. व्यसनांपासून दूर रहा. विरोधकांच्या चाली वाढतील. भाग्याची उत्तम साथ राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नवीन योजनांची आखणी कराल.
उपाय/उपासनाः कपाळावर केसर, चंदनाचा टिळा लावा. सावध रहाः मंगळवार, शुभ अंकः 3, शुभ रंगः लाल.
कर्क
तब्येत नरम गरम राहील. हवामानातल्या बदलाचा त्रास होईल. पैशाचे नवे स्रोत उघडतील. कौटुंबिक सुख उत्तम आहे. आपल्या पराक्रमाने यश खेचून आणाल. संततीसाठी काळ उत्तम असेल. अचानक धन प्राप्तीचे योग. पण प्रवास करताना जपून रहा. भाग्य मेहेरबान आहे. संधींचा फायदा घ्या. मित्रांची साथ राहील.
उपाय/उपासनाः गरजूला गरम कपडे दान करा. सावध रहाः सोमवार, शुभ अंकः 2, शुभ रंगः पांढरा.
सिंह
एक घाव दोन तुकडे या तुमच्या स्वभावाला आवर घालावा लागेल. तब्येत उत्तम राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कागदपत्रे सांभाळा. घरासाठी उपयोगी वस्तू खरेदी कराल. गुंतवणूक करताना धोका पत्करू नका. शत्रूपक्षाच्या कारवाया चालणार नाहीत. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
उपाय/उपासनाः मंगळवारी गणपतीला दुर्वांची माळ अर्पण करा. सावध रहाः मंगळवार, शुभ अंकः 3, शुभ रंगःआस्मानी.
कन्या
तब्येतीचा पाया उत्तम आहे. उधार दिलेले पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे चिडचिड होईल. लेखी व्यवहार यशस्वी होतील. लहान भावाचे सहाय्य मिळेल. जमिनीचे व्यवहार सध्या नको. जुगार, शेअर मार्केटपासून दूर रहा. तुमच्या पाठीमागे बोलणाऱयांची तोंडे गप्प होतील. देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.
उपाय/उपासनाः मुंग्यांना साखर घाला, सावध रहाः शुक्रवार, शुभ अंकः 4, शुभ रंगः सोनेरी
तुळ
लहान मोठी दुखणी डोके वर काढतील. वाणीचा प्रभाव पडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. लेखी व्यवहारात चूक होऊ देऊ नका. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. संततीकडून अपेक्षा पूर्ण होतील. डोळय़ांचे विकार संभवतात. भाग्याची उत्तम साथ आहे. नोकरी व्यवसायासाठी समाधानकारक योग.
उपाय/उपासनाः ‘मां पाही भगवती दुर्गे’चा जप करा. सावध रहाः रविवार, शुभ अंक ः 4, शुभ रंगः ग्रे.
वृश्चिक
तब्येत भक्कम राहिल. कुटुंबाकरता वेळ न काढता आल्यामुळे रुसवे फुगवे होतील. नवीन कामे संथगतीने पण पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. पण चित्त विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. मोहापासून दूर रहा. कष्टाची तयारी ठेवावी लागेल. लाभ होतील पण जरा उशिरा.
उपाय/उपासनाः वडिलांची सेवा करा, मेवा मिळेल. सावध रहाः सोमवार, शुभ अंकः 6, शुभ रंगः आकाशी
धनु
विचारवंतांची रास आहे. पण अति विचाराने निर्णय लांबू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. स्त्रियांनी तब्येत जपावी. विनाकारण वादाला सामोरे जाऊ नका. लेखन प्रकाशन या दृष्टीने वेळ अनुकूल आहे. वाहन दुरुस्तीला द्यावे लागू शकते. जीवनसाथीचा अपेक्षेप्रमाणे सहयोग न मिळाल्याने चिडचिड होईल.
उपाय/उपासनाः श्री गुरु चरणांवर दुधाचा अभिषेक करा. सावध रहाः शनिवार, शुभ अंकः 7, शुभ रंगः क्रीम.
मकर
तुमची चिकाटी आणि समजूतदारपणा कामाला येणार आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्या. चमचमीत खाण्यामुळे त्रास होऊ शकतो. शक्मयतो जवळचे प्रवास टाळा. नोकरी व्यवसायात विवादाचे प्रसंग संभवतात. वाहन चालवताना सावध रहा. गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. लाभाच्या संधी मिळतील. उपयोग करून घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल.
उपाय/उपासनाः शनिवारी रात्री अन्नदान करा. सावध रहाः गुरुवार, शुभ अंकः 5, शुभ रंगः करडा.
कुंभ
तुमचा गूढ स्वभाव सहसा कुणाला कळत नाही आणि त्यामुळे गैरसमज होतात. धरसोड वृत्तीला आळा घाला. तब्येत ठणठणीत राहील. घेतलेल्या कामात यश आहे. कामानिमित्त छोटा प्रवास करावा लागेल. त्यामुळे दमछाक होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद लुटाल. छोटय़ा छोटय़ा गोष्टी मनावर घेऊ नका.
उपाय/उपासनाः काजळाची डबी जवळ ठेवा. सावध रहाः मंगळवार, शुभ अंकः 9, शुभ रंगः काळा.
मीन
सध्याचे वेळ आरोग्य जपण्याची आहे. जुने आजार बळावू नयेत याची काळजी घेतली पाहिजे. नोकरी व्यवसायामध्ये स्पर्धक बाजी मारण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत. तिकडे जास्त लक्ष द्या. पण भाग्याची चांगली साथ असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. खर्च जास्त होतील. आवर घाला.
उपाय/उपासनाः बुधवारी मारुतीला लाल फुलांची माळ अर्पण करा, सावध रहाः शुक्रवार, शुभ अंकः 6, शुभ रंगः पिवळा.