भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
गांधीनगर येथील घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
उज्ज्वलनगर येथे कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 14 जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा गांधीनगर परिसरात भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने दोन मुले जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.
गांधीनगर-निझामुद्दीन गल्ली दुसरा क्रॉस येथील कैफ पाच्छापुरे आणि ऐझल पठाण ही मुले कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहेत. या मुलांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी उज्ज्वलनगर, गांधीनगर परिसरात हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा शनिवारी कुत्र्यांनी मुलांवर हल्ला केला आहे. ही घटना समजताच नगरसेवक अजिम पटवेगार यांनी त्या मुलांची विचारपूस केली.
या घटनेनंतर गांधीनगर परिसरात काहीवेळ गोंधळ उडाला होता. त्या कुत्र्याला पकडण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. मात्र ते कुत्रे सापडले नाही. त्यानंतर महानगरपालिकेला माहिती देण्यात आली. महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. शनिवारी महानगरपालिकेने इतर भागामध्ये कुत्री पकडण्याची मोहीम राबविली होती. आता रविवारपासून गांधीनगर परिसरातही कुत्री पकडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.