बेळगावच्या पोलीस श्वानांचा राज्यात डंका
2 सुवर्णांसह 8 पदकांची कमाई : स्फोटक तपास विभागात राज्य पातळीवर कामगिरी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा पोलीस श्वान दलातील माया या श्वानाने स्फोटक तपास विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेळगाव शहर पोलीस दलातील रोझी हिने गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
दि. 20 व 21 नोव्हेंबर रोजी बेंगळूर येथे झालेल्या राज्य पातळीवरील कर्तव्य मेळाव्यात संपूर्ण राज्यातील अधिकारी व श्वानपथकांनी भाग घेतला होता. स्फोटकांचा तपास करणाऱ्या माया हिने स्फोटक तपास विभागात राज्य पातळीवर सरस कामगिरी केली आहे. शहर पोलीस दलातील रोझीनेही गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
पोलीस दलातील प्रत्येक श्वानाला दोन हँडलर
माया हिला मलकारी यमगार व मंजुनाथ कसवण्णावर हे हाताळतात. रोझीला रुद्रय्या माविनकट्टीमठ व संतोष पाटील हे हाताळतात. पोलीस दलातील प्रत्येक श्वानाला दोन हँडलर असतात. ते त्यांचेच आदेश ऐकतात. माया व रोझी या दोघी पोलीस कर्तव्य मेळाव्यात आपल्या हँडलरांसह सहभागी झाल्या होत्या.
बेळगाव उत्तर विभागाला एकूण 8 पदके
राज्य पातळीवरील या मेळाव्यात बेळगाव उत्तर विभागाला एकूण 8 पदके मिळाली आहेत. त्यापैकी 2 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदकांचा समावेश आहे. या मेळाव्यात 328 अधिकारी सहभागी झाले होते. बेळगाव उत्तर विभागातील विजापूर, बागलकोट, धारवाड, गदगसह संपूर्ण राज्यातून 57 श्वान सहभागी झाले होते.
पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित रोझीची देखरेख
राज्य पातळीवरील या मेळाव्यात माया व रोझीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मायाची निगराणी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते तर रोझीची देखरेख पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या अखत्यारित केली जाते.