बेरोजगारी-कर्जबाजारीपणा-आत्महत्या-काही निरीक्षणे
अलीकडेच प्रकाशित झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वैश्विक जोखीम अहवालाप्रमाणे (ग्लोबल रिस्क रिपोर्ट) “युवकांचा सार्वत्रिक भ्रमनिरास’’ (वाइडस्पेड युथ डिसील्युशनमेंट) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मोठा जोखीम घटक ठरणार असे दिसते.
युवकांचा भ्रमनिरास पुढील गोष्टीतून व्यक्त होतो.
- निरूद्योगीपणा
- आत्मविश्वासाचा आभाव
- प्रचलित आर्थिक, राजकीय, सामाजिक रचनेसंबंधी जागतिक पातळीवर
अविश्वास
- त्यातून सामाजिक स्थैर्याला निर्माण होणारा धोका
- व्यक्तिगत समाधानावर होणारा प्रतिकूल परिणाम
- आर्थिक उत्पादनावर होणारा प्रतिकूल परिणाम
2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभेत सरकारने एक धक्कादायक, संताप व करूणा निर्माण करणारी माहिती सादर केली. त्याप्रमाणे 2018-2020 या काळात 25000 पेक्षा अधिक भारतीयांनी बेरोजगारी तथा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या केल्या. खरेतर बेरोजगारी हे कर्जबाजारीपणाचे कारण प्रामुख्याने असते, हे उघड आहे. त्यातही बेरोजगारी हे आत्महत्त्येचं कारण असणारी संख्या वाढत आहे व 2020 मध्ये बेरोजगारी आत्महत्त्यांची संख्या 3548 झाली. या बाबतीत ठराविक कालांतर श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) व सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआई) यांची आकडेवारी, पुरेसा पुरावा देतात.
सर्व श्रमशक्ती लक्षात घेता, बेरोजगारीचे विभाजन विभिन्न आहे. सीएमआईच्या आकडेवारीवरून असे दिसते की -
- तरूण वयोगटातील बेरोजगारी कमाल आहे.
- वाढत्या शिक्षणाबरोबर बेरोजगारी वाढते.
- महिलांमधील बेरोजगारी प्रमाण अधिक आहे.
कांही संकल्पना " समजून घेण्यासाठी कांही संकल्पनांच्या व्याख्या लक्षात घेणे आवश्यक आहे.
अ. बेरोजगारी दर
बेरोजगार संख्येचे एकूण श्रम शक्तीशी टक्के प्रमाण म्हणजे बेरोजगारी दर (अनएम्प्लॉयमेंट रेटस-युआर)
ब. श्रम शक्ती सहभाजन दर (लेबर फोर्स प्रीसीपेशन रेट)
रोजगारात असणाऱया/ रोजगाराच्या शोधात असणाऱया लोकांचे काम करण्याच्या वयोगटातील एकूण लोकसंख्येशी टक्के प्रमाण म्हणजे श्रम शक्ती सहभाजन दर.
निवडणुका व बेरोजगारीचा प्रश्न
लोकशाही व्यवस्थेत सत्तेवरचा, बहुमताचा राजकीय पक्ष ठरविण्यासाठी मुक्त, प्रौढ, खुल्या निवडणुका हा महत्त्वाचा पाया आहे. गरीबी, बेरोजगारी, भाववाढ, विषमता, हे प्रश्न सोडविणाऱया उमेदवारांना वा पक्षास सर्वसाधारण मतदार मतदान करतील, करतात असे सर्वसाधारण गृहितक आहे.
विश्लेषणासाठी आपण -
- सत्ता प्रारंभ (सप्टेंबर-2016)
- कोविड - 19 पूर्व / स्थिती
- सप्टेंबर-डिसेंबर-2021 (5 वर्षांची प्रवृत्ती दाखविणारी आकडेवारी)
अशी आकडेवारी पुढील तक्त्यात घेतली आहे. आकडेवारी मुख्यतः उत्तर प्रदेश व पंजाब या राज्यांशी संबंधित आहे.
ही आकडेवारी सीएमआई अधिक एक्स्प्रेस रिसर्च ग्रुपची (इंडियन एक्स्प्रेस -11/02/2022) आहे.
तक्ता अ, ब, व क च्या आधारे पुढील विधाने करता येतील.
उत्तर प्रदेशमधील
तरूणांचा रोजगारी दर 2016-2021 या 5 वर्षात लक्षणीय घटला.
पदवीधर व अधिक सुशिक्षितांचा रोजगारी दर या 5 वर्षात घटला.
तुलनेने महिलांचा रोजगार दर फारच कमी आहे व तो घटती प्रवृत्ती दाखवितो.
राष्ट्रीय रोजगार सर्वच निकषांवर उच्चतर आहे.
या ठिकाणी राष्ट्रीय आकडेवारी तक्ता अ, ब, व क प्रमाणेच आहे.
उपरोक्त तक्ते अ, ब, व क प्रमाणे पुढील निरीक्षणे करता येतील.
पंजाबमध्ये 2016-2021 या काळात -
तरूणांचा रोजगार दर उच्चतर आहे, पण तोही घटला.
पदवीधर (+) या गटातील रोजगार दर उच्चतर आहे, पण तोही घटला.
स्त्रियांचा रोजगार दर लक्षणीय घटला. मुळात तो राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे.
अशाच प्रकारची निरिक्षणे गोवा राज्याला व उत्तराखंड राज्यालाही लागू होतात. पण उत्तराखंड राज्यात सुशिक्षितांचा (पदवीधर +) रोजगार दर वाढला आहे.
व्यापक पातळीवर-महामारीच्या काळात रोजगार दर सर्वच राज्यात व सर्वच प्रकारात कमी झाला आहे.
वेगळ्या शब्दांत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड व गोवा या राज्यात होवू घातलेल्या निवडणुकांमध्ये सत्ता पालट झाल्यास “बेरोजगारी’’ (वाढती) हा सत्ताधारी पक्षास निवडणुकीत प्रतिकूल-अडचण करणारा घटक ठरेल, असे म्हणता येईल.
प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, कोल्हापूर
ख. उत्तर प्रदेश
अ. तरूणातील रोजगार दर (15-29 वर्षे) - (अंक दशलक्षात)
एकूण लोक | एकूण रोजगार | रोजगार दर (टक्के) | |
2016 | 62.07 | 15.39 | 24.79 |
2019 | 66.22 | 13.17 | 17.14 |
2021 | 70.99 | 12.17 | 17.14 |
भारत 2021 | 375.31 | 73.11 | 19.48 |
ब. पदवीधरातील रोजगार दर (अंक दशलक्षात) -
एकूण लोक | एकूण रोजगार | रोजगार दर (टक्के) | |
2016 | 18.97 | 9.30 | 49.02 |
2019 | 19.83 | 9.92 | 50.03 |
2021 | 18.09 | 7.91 | 43.73 |
भारत 2021 | 99.95 | 49.31 | 49.33 |
क. स्त्रियातील रोजगार दर (अंक दशलक्षात) (15 वर्षावरील)-
एकूण स्त्रिया | रोजगार स्त्रिया | रोजगार दर (टक्के) | |
2016 | 68.91 | 2.65 | 3.85 |
2019 | 77.37 | 2.15 | 2.78 |
2021 | 80.47 | 1.51 | 1.88 |
भारत 2021 | 502.55 | 41.55 | 8.19 |
ख ख. पंजाब
अ. तरूणातील रोजगार दर (15-29 वर्षे) - (अंक दशलक्षात)
एकूण लोक | एकूण रोजगार | रोजगार दर (टक्के) | |
2016 | 77.67 | 15.02 | 32.63 |
2019 | 81.96 | 23.61 | 28.79 |
2021 | 86.99 | 20.08 | 23.08 |
ब. पदवीधरातील रोजगार दर (अंक दशलक्षात) -
एकूण लोक | एकूण रोजगार | रोजगार दर (टक्के) | |
2016 | 30.20 | 14.50 | 48.01 |
2019 | 33.10 | 14.60 | 44.11 |
2021 | 31.94 | 13.63 | 42.67 |
क. स्त्रियातील रोजगार दर (अंक दशलक्षात) (15 वर्षावरील)-
एकूण स्त्रीया | रोजगार स्त्रिया | रोजगार दर (टक्के) | |
2016 | 10.66 | 0.59 | 5.53 |
2019 | 11.13 | 0.34 | 3.05 |
2021 | 11.36 | 0.13 | 1.14 |