बीएसएनएलची मालमत्ता विक्रीसाठी एमएसटीसीसोबत भागीदारी
पाच राज्यांमधील मुख्य 13 अतिरिक्त मालमत्तांचा समावेश होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल) यांनी एमएसटीसीसोबत पाच राज्यांमधील प्रमुख ठिकाणी असलेल्या 13 अतिरिक्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी भागीदारी केली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील 13 मालमत्तांच्या विक्रीसाठी 5 डिसेंबरपर्यंत निविदा मागवल्या जाणार आहेत.
बीएसएनएलने एमएसटीसी पोर्टलद्वारे मालमत्तांच्या ऑनलाइन विक्रीसाठी एमएसटीसी सोबत करार केला असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील टेल्कोने सांगितले. तोटय़ात चाललेल्या बीएसएनएलने 20,160 कोटी रुपयांच्या 14 मालमत्ता शोधल्या होत्या. त्यानंतर गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे विक्रीसाठी यादी सुपूर्द करण्यात आली.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सांगितले की, बीएसएनएलकडे देशाच्या विविध भागांमध्ये जमीन आणि इमारती आहेत. कंपनी आक्रमकपणे आपल्या अतिरिक्त मालमत्तेची कमाई करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी. या रकमेचा उपयोग टेलिकॉम नेटवर्कच्या विस्तारासाठी आणि कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी केला जाईल.