बिहारमध्ये मतदारचोरीचा डाव : राहुल गांधी
पाटण्यातील निदर्शनांमध्ये निवडणूक आयोगाला केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ पाटणा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील इंडी आघाडीच्या चक्काजाम निदर्शनांमध्ये सामील होत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. बिहार निवडणुकीला महाराष्ट्राप्रमाणेच चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरिबांचा हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. परंतु आम्ही असे होऊ देणार नाही. बिहारच्या जनतेचे भविष्य वाया जाऊ देणार नाही. इंडी आघाडी बिहारच्या जनतेसोबत उभी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इंडी आघाडीने यश मिळविले. तर विधानसभा निवडणुकीत इंडी आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यावेळी आम्ही काही बोललो नाही, परंतु या गंभीर विषयावर काम सुरू केले. आम्ही तपास केला असता लोकसभेपेक्षा अधिक मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याचे आढळून आले. आश्चर्यकारकपणे एक कोटीपेक्षा अधिक मते वाढली. एका दिवसात 4-5 हजार मतदारांची नोंदणी झाली. मतदार यादी उपलब्ध करण्याची मागणी केली असता निवडणूक आयोगाने मौन बाळगले. आजवर आम्हाला महाराष्ट्राची मतदारयादी मिळालेली नाही. हाच खेळ आता बिहारमध्ये खेळण्याचा डाव असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
ज्याप्रकारे महाराष्ट्राची निवडणूक चोरली गेली, तशीच बिहारची निवडणूक चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. हा गरिबांची मते हिरावून घेण्याचा प्रकार आहे. परंतु सरकारला हे बिहार आहे हे ठाऊक नसावे. बिहारची जनता स्वत:चा हक्क हिरावू घेऊ देणार नाही. बिहारची जनता घाबरविणारी नाही असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
आयोगावर मोठा आरोप
निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजप अन् संघाच्या हस्तकांप्रमाणे बोलत आहेत. हे अधिकारी स्वत:ची जबाबदारी विसरले आहेत. त्यांचे काम राज्यघटनेचे रक्षण करणे आहे. कायदा या अधिकाऱ्यांवरही लागू होतो, हे विसरले जाऊ नये. या अधिकाऱ्यांचे काम बिहारच्या जनतेच्या मताचे रक्षण करणे आहे. पूर्वी निवडणूक आयुक्त सर्व पक्ष अन् सरन्यायाधीश मिळून निवडत होते, परंतु आता केवळ भाजपच निवडणूक आयुक्त निवडत आहे. लोकांचे केवळ मतच नव्हे तर भविष्यही चोरले जात असल्याचे बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो. परंतु इंडी आघाडी लोकांसोबत उभी आहे. आम्ही लोकांच्या मतांची चोरी होऊ देणार नाही असे राहुल यांनी म्हटले आहे.
कन्हैया कुमारांना रोखले
बिहारमध्ये एसआयआर (स्पेशल इन्स्टेंसिव्ह रिव्हिजन) विरोधात बुधवारी इंडी आघाडीकरडून चक्काजाम पुकारण्यात आला होता, यादरम्यान राहुल गांधी, राजद नेते तेजस्वी यादव आणि महाआघाडीचे अन्य नेते एका ओपन ट्रकमध्ये सवार झाले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनीही या ट्रकवर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यापासून रोखण्यात आले. तर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनाही ट्रकमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले आहे. तेजस्वी यादव हे कन्हैया कुमार यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवू पाहत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.