For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाबा धोंड यांचे निधन

06:45 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाबा धोंड यांचे निधन
Advertisement

तरुण भारत,  लोकमान्य परिवाराच्यावतीने श्रद्धांजली

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सुभाषचंद्रनगर येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग ऊर्फ बाबा नरहरी धोंड (वय 96) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नलिनी, मुले नितीन, अशोक व मुलगी सविता, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचे ते भावोजी होत.

Advertisement

शहापूर स्मशानभूमी येथे बाबा धोंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘तरुण भारत’ परिवाराच्यावतीने संपादक जयवंत मंत्री यांनी व लोकमान्य परिवाराच्यावतीने गजानन धामणेकर यांनी पुष्पचक्र वाहिले. जयवंत मंत्री, उद्योजक आप्पासाहेब गुरव, माजी महापौर विजय मोरे यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. याप्रसंगी शहरातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

सीबा कंपनीमध्ये वर्क्स मॅनेजर म्हणून काम पाहिले

बाबा धोंड यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1928 रोजी गोव्याच्या पाळी-वेळगे येथे झाला. त्या काळी ग्रामीण भागात शिक्षणाचे वारे फारसे वाहत नव्हते. त्यामुळे बाबा यांनी लहानपणी गुराखी म्हणून आणि शेतकरी म्हणून काम करण्यात आनंद मानला. त्यांची बहीण कोल्हापूरचे उद्योजक तात्या तेंडुलकर यांची पत्नी. तात्यांनी त्यांना शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. याचा ते नेहमीच उल्लेख करत. एक गुराखी ते एक कुशल अभियंता म्हणून त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा होता. लंडनमधून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. सीबा कंपनीमध्ये वर्क्स मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले. नोसिल कंपनीमार्फत ते मँचेस्टरला व रॉटरडॅम येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. तर सीबा कंपनीने त्यांना प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंडला पाठविले होते. निवृत्तीनंतर त्यांनी सीबा-गेगीच्या भागीदारीमध्ये ‘एबिक रेमेडिज’ ही फार्मास्युटिकल कंपनी सुरू केली.

जगभरातील विविध देशांना भेट

या प्रशिक्षणामुळेच जगभरातील विविध देशांना भेट देण्याची आवड त्यांनी जोपासली आणि अमेरिका, मलेशिया, थायलंड, ब्रह्मदेश, चीन, तैवान, युरोप अशा अनेक देशांमध्ये सातत्याने प्रवास केला. त्यांचे भाऊ माधव धोंड हे हिंदुस्थान लिवर कंपनीमधून निवृत्त झाले. मोठे बंधू बागायतदार होते. तर आणखीन एक बंधू कर्नल दाजी धोंड यांनी 71 साली पाकिस्तानच्या सीमेवर पराक्रम गाजविल्याने त्यांना टायगर धोंड म्हणून ओळखले जात. त्यांचे जावई उमेश ठाकुर हे टीसीएस कंपनीमध्ये अमेरिका आणि इंग्लंड येथे कार्यरत राहून नुकतेच निवृत्त झाले.

सामाजिक क्षेत्रातही वावर

बाबा धोंड यांचा मुळातच बोलका स्वभाव आणि जिज्ञासा यामुळे सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर होता. एसकेई सोसायटीचे ते सदस्य होते. तर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले. पर्यावरणाबद्दल त्यांना विशेष आस्था होती. नेहमी सकारात्मक वृत्ती हे त्यांचे वैशिष्ट्या होते. वयाच्या 96 व्या वर्षीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन गॅजेट्स शिकण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळे या तंत्रज्ञानाशी त्यांनी फार लवकर जुळवून घेतले होते. प्रवासाच्या आवडीपोटी अनेक देशांमध्ये त्यांनी प्रवास केला. अनेकांसाठी फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड अशीच त्यांची भूमिका राहिली.

त्यांच्या जगप्रवासाच्या अनुभवाचा त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना लाभ झाला. आज साईश, शलाका, तन्वी ही नातवंडे परदेशातच शिक्षण घेत आहेत. सागर हा नातू बेळगावमध्येच असून पणतू सनव याच्या जन्मानंतर बाबा धोंड यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाही झाला.

बाबा धोंड म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व!       -किरण ठाकुर

बाबा धोंड म्हणजे एक हरहुन्नरी आणि बोलघेवडे परंतु अतिशय कष्टाळू असे व्यक्तिमत्त्व होते. एखाद्या व्यक्तीचा दिनक्रम किती योग्य असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे बाबा होत. या वयातही त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. मित्रपरिवारही मोठा होता. केवळ ठाकुर व धोंड नव्हे तर ‘तरुण भारत’ आणि लोकमान्य परिवारातही त्यांचा वडीलकीच्या नात्याने सर्वांनाच मोठा आधार होता, अशा भावना तऊण भारतचे समूहप्रमुख किरण ठाकुर यांनी व्यक्त केल्या.

Advertisement
Tags :

.