बाजारातील घसरणीचे सत्र सुरूच
सेन्सेक्स 208 अंकानी तर निफ्टी 62.95 टक्क्यांनी घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, तर अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला दिलासा देणाऱया तरतूदी होणार याबाबत मोठी उत्सुकता लागून असल्यामुळे त्याचे काहीसे पडसाद सध्या मुंबई शेअर बाजारातील घडामोडींवर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. चालू आठवडय़ातील सलग तिसऱया सत्रात बुधवारी सेन्सेक्स 208 अंकाची घसरण झाली आहे. मुख्य क्षेत्रात उर्जा, पॉवर, वाहन आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे बाजारात घसरण राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 473 अंकावर कार्यरत राहिला होता. परंतु तो बंद होताना मात्र 208.43 अंकानी घसरुन निर्देशांक 41,115.38 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 62.95 अंकानी घसरुन निर्देशांक 12,106.90 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये ओएनजीसीचे समभाग 5.13 टक्क्यांनी घसरले आहेत. तर एनटीपीसी,मारुती सुझुकी,कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, स्टेट बँक आणि भारती एअरटेल यांचे समभग मात्र 1.86 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत.
अर्थसंकल्पाची चाहूल
सध्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी क्षेत्रासह विविध कंपन्यांच्या समभाग विक्रीबाबत गुंतवणूकदारांमध्ये काहीशी उत्सुकता तर काहीसे दडपण आहे. यामुळे अर्थसंकल्प सादरीकरणा अगोदरच बाजारात नफा कमाईमुळे घसरणीचे सत्र सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे जागतिक पातळीवरील गुंतवणूदार यासंदर्भात कोणती भूमिका घेणार आहेत. यावरही येत्या काळातील बाजाराचा प्रवास निश्चित होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.