'फोर्ब्स'ची यादी जाहीर; मुकेश अंबानी श्रीमंतांमध्ये अव्वल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
2020 मधील पहिल्या 100 श्रीमंत भारतीयांची यादी फोर्ब्स कडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव सलग 13 व्या वर्षी देखील पहिल्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, पहिल्या 100च्या यादीतील भारतीयांनी एकूण 517.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती गोळा केली आहे. गेल्या वर्षी फोर्ब्सच्या यादीमध्ये सामील झालेल्या लोकांच्या मालमत्तेपेक्षा हा आकडा 14 टक्के जास्त आहे. एवढेच नव्हे तर बर्याच नवीन नावांनीही या यादीमध्ये आपले स्थान मिळवले आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आहेत. मुकेश अंबानींकडे 88.7 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. गौतम अदानी यांचे दुसर्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी शिव नादर असून, त्यांच्याकडे 20.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी आहेत. दमानी यांच्याकडे 15.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर हिंदुजा बांधव पाचव्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 12.8 अब्ज डॉलर्स आहे.
सायरस पूनावाला 11.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. पालनजी मिस्त्री सातव्या क्रमांकावर आहेत. त्याच्याकडे 11.4 अब्ज डॉलर्स आहेत. उदय कोटक 11.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या क्रमांकावर आहे. गोदरेज फॅमिली 9 व्या स्थानावर आहे, त्यांची संपत्ती 11 अब्ज डॉलर्स आहे. दहाव्या क्रमांकावर लक्ष्मी मित्तल असून, त्यांची संपत्ती 10.3 अब्ज डॉलर्स इतकी आहे.