‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर मनोरंजनाचा खजिना
आपल्याकडे मराठी साहित्याचे भंडार आहे आणि याच मराठी साहित्याला मनोरंजनच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ सुरु करण्यात आले आहे. साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या या मायमराठीला सातासमुद्रापार पोहोचवणारे ‘प्लॅनेट मराठी’ हे मराठीतील पहिलेवहिले ओटीटी असून अखेर ऑगस्टमध्ये ते अधिकृतरित्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या पूर्वी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर जगभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणारा ‘जून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता प्लॅनेट मराठीच्या ‘जॉबलेस’, ‘सोपं नसतं काही’, ‘हिंग पुस्तक तलवार’, ‘बाप बीप बाप’ आणि ‘परीस’ या वेगवेगळय़ा जॉनरच्या जबरदस्त वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाल्या
आहेत.
इतक्या महिन्यांच्या प्रतिक्षेला आता काही दिवसांतच पूर्णविराम लागणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी हजारो तासांचा मनोरंजनात्मक खजिना उपलब्ध होणार असून यात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या कंटेन्टचा समावेश असेल. प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना वेबसिरीज, चित्रपट, संगीत, कराओके, कॉन्सर्ट, टॉक शो असे विविध मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जगभरातील मराठमोळय़ा प्रेक्षकांचे मनोरंजन होणार
हे नक्की !