पेट्रोल-डिझेलसंबंधी दिलासा मिळण्याची अपेक्षा
सरकारने आखली मोठी योजना : काही दिवसांपर्यंत स्थिर राहू शकतात दर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महागाईचा मार झेलणाऱया देशाच्या जनतेवर दररोज वाढणाऱया पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आणखीन भार टाकला आहे. 17 दिवसांमध्ये 14 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य जनतेला पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना तयार केली आहे. योजनेमुळे आगामी काही दिवसांपर्यंत इंधनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
इंधनाच्या वाढत्या दरांदरम्यान सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने तयार केलेल्या योजनेनुसार पेट्रोल-डिझेलचे स्थिर राहण्याची शक्यता आहे. सरकारकडून देशातील प्रमुख तेल विपणन कंपन्यांना अशाप्रकारचे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर घट न झाल्यास आणि दर अशाचप्रकारे वाढत राहिल्यास सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचे पाऊल उचलू शकते. पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणाऱया व्हॅटमध्ये कपात करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.
10 दिवसांत 10 रुपयांहून अधिक वाढ
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये गुरुवारी कुठलाच बदल झालेला नाही. तर बुधवारपर्यंत 17 दिवसांमध्ये 14 वेळा दरवाढ करण्यात आली होती. 17 दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलिटर 10 रुपयांपेक्षा अधिक वाढले आहेत.
पेट्रोलियम मंत्र्यांचे आश्वासन
संसदेत विरोधी पक्षांनी इंधनदरावरून सरकारला लक्ष्य केल्यावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्याने दरवाढ करावी लागत असल्याचे स्पष्टीकरण दिले हेते. तसेच जनतेला इंधनदराप्रकरणी दिलासा मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आश्वासनही दिले होते.
कच्चे तेल महागले
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचा दर 139 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचला होता. परंतु पुढील काही दिवसात हा दर कमी झाला असला तरीही 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास राहिला आहे. कच्चे तेल महागल्याने भारतीय तेल कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यातच तेल कंपन्यांना 19 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.