For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूरग्रस्तांसाठी 29 लाखांची मदत प्राप्त

05:55 AM Aug 12, 2021 IST | Abhijeet Khandekar
पूरग्रस्तांसाठी 29 लाखांची मदत प्राप्त
Advertisement

जुलैमधील पुरात 1145 कुटुंबे झाली बाधित : 118 हेक्टर जमीन गेली खरडून

Advertisement

प्रत्येकी 7,500 रुपये मदत दिली जाणार

जिल्हय़ात एकूण नुकसान अडीच कोटीचे नुकसान

Advertisement

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात 21 ते 23 जुलै दरम्यान झालेल्या पुरामध्ये 1146 कुटुंबे बाधित झाली होती. या कुटुंबाना तातडीची मदत देण्यासाठी शासनाकडून 29 लाख 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. प्रत्येकी साडेसात हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही मदत तातडीने तालुक्मयात वितरण करून बाधितांना देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, पुरामुळे 118 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. तर व्यक्ती व जनावरे दगावल्याने आणि घरे, गोठय़ाचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

संपूर्ण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन पूर आला होता. यामध्ये जीवित व वित्त हानी मोठय़ा प्रमाणात झाली होती. या पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यासाठी बाधित कुटुंबाना मदत देण्याकरिता 29 लाख 20 हजार एवढे सानुग्रह अनुदान जिल्हय़ाला प्राप्त झाले आहे. या अनुदानामधून आणि प्रशासनाकडील निधीतून प्रत्येक कुटुंबाला तातडीची सात हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त बधितांना तातडीची मदत तात्काळ देण्यात यावी तसेच तौक्ते चक्रीवादळ मधील बाधितांनाही आलेली मदत वेळीच देण्यात यावी, अशाही सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.

जुलैमध्ये अतिवृष्टी होऊन आलेल्या पुरामध्ये एकूण तीन व्यक्ती दगावल्या आहेत. यामध्ये दोन व्यक्तांचा डोंगर कोसळून दरडीखाली सापडल्याने मृत्यू झाला. तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झालेला आहे. 29 जनावरे दगावली असून त्यात 27 मोठय़ा दुधाळ आणि दोन लहान जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात एकूण एक हजार 145 कुटुंबे बाधित झाली. यामध्ये घरामध्ये पाणी जाऊन कुटुंबांना स्थलांतर करावे लागले होते तसेच बांदा व खारेपाटण येथील दुकानांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले होते.

जिल्हय़ात 15 घरे आणि सात झोपडय़ा पूर्णत: कोसळल्या आहेत. 732 पक्क्या घरांची, 101 कच्या घरांची, 100 गोठय़ांची पडझड झाली आहे. 118 हेक्टर जमीन पुरात खरडून गेली आहे. ही सर्व जीवित व वित हानी मिळून सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

  पूरग्रस्तांना कशा पद्धतीने व कोणाला किती मदत द्यावी, याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे मदत निधी प्राप्त होताच तात्काळ बाधित कुटुंबाच्या बँक खाती रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.