पीएनजी-सीएनजी दरातही वाढ
50 पैसे ते 1 रुपया वाढ : नवीन दर लागू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर आता सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत पीएनजीच्या (पाईप्ड नॅचरल गॅस) दरात प्रतिकिलो 1 रुपये, तर सीएनजीच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या किमतींनंतर दिल्लीत पीएनजी 36.61 रुपये आणि सीएनजी 59.01 रुपये किलोवर पोहोचला आहे. नवीन दर गुरुवारपासूनच लागू करण्यात आले आहेत. दिल्लीसह गोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि नजिकच्या शहरांमध्ये ही दरवाढ झाल्याचे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल)ने गुरुवारी सकाळी जाहीर केले. दरम्यान, गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने वाहनधारकांना किंचित दिलासा मिळाला आहे. देशभरात मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. बुधवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी तर मुंबईत 85 पैशांनी वाढ झाली. या वाढीनंतर महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल 114.80 रुपये आणि डिझेल 97.44 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. मंगळवारी डिझेल-पेट्रोलच्या दरात 80 पैशांसोबतच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही 50 रुपयांची वाढ करण्यात आली. रशिया-युपेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे.