पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 10 कोटी प्राप्त
वैशिष्टय़पूर्ण योजनेमधुन मान्यता, खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती
प्रतिनिधी /सातारा
सातारा नगरपरिषदेने 1 रुपया नाममात्र किंमतीमध्ये उपलब्ध करुन घेतलेल्या 40 गुंठे जागेमध्ये 9 मजली प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी वैशिष्टय़पूर्ण योजनेमधून सुमारे 60 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला दिला होता. त्यानुसार शासनाच्या 90 टक्के हिश्यापैकी रुपये 10 कोटींचा पहिला हप्ता शासनाने नुकताच उपलब्ध करुन दिला आहे. सातारा नगरपरिषदेनेही अंदाजपत्रकात गतवर्षी आणि यावर्षी भरीव तरतुद केली असल्याने, आता या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करुन कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे, असेही उदयनराजे यांनी पत्रकात आवर्जुन नमुद केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना, दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की, ज्या ठिकाणावरुन सातारा शहरातील नागरिकांच्या विकासाची, सुरक्षित वाहतुकीची आणि जन्मापासून अखेरपर्यंत विविध निकडींची समाजउपयोगी कामे होत असतात. नगरपरिषदेची विद्यमान कार्यालय इमारत अपुरी पडणार वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रशासकीय इमारतीकरीता सातारा विकास आघाडीने प्रथम नरेंद्र दाभोळकर पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांच्याकडुन जिल्हा परिषदेच्या इमारती जवळील सुमारे 40 गुंठे जागा, सातारा नगरपरिषदेकडे नाममात्र एक रुपयामध्ये हस्तांतरीत करुन उपलब्ध करुन घेतली.
त्यानंतर या जागेवर अत्याधुनिक वैशिष्टय़े असलेली 9 मजल्याची इमारत उभारण्याकरीता सातारा विकास आघाडीने नगरपरिषदेच्या माध्यमातुन सुमारे 60 कोटींचे अंदाजपत्रक आणि स्पर्धात्मक प्राप्त झालेले आराखडे तयार केले. सदरचा प्रस्ताव वैशिष्टय़पूर्ण योजनेमधुन शासनाकडे निधी उपलब्ध होण्याकरीता मंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही समक्ष भेट घेऊन, विस्तृत चर्चा करुन दिला होता. त्यानुसार राज्यशासनाने 10 कोटींचा पहिला हप्ता वितरित केला आहे.
हद्दवाढ झालेल्या भागासह सातारा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जागेत नगरपरिषदेची सुसज्य अशी मुख्य प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. सुसज्ज विविध पदाधिकारी दालने, कॉन्फरन्स हॉल, व्हि. सी. हॉल, नगरपरिषदेचे अद्यावत सभागृह, विश्रांतीगृह, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी उपहारगृह, अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष, यासह विविध सुविधासह बहुमजली इमारत उभी करण्यात येणार आहेत. आता वैशिष्टय़पूर्ण योजनेमधून शासनाने 90 टक्के खर्च उचलला आहे. त्याचा पहिला हप्ता असलेल्या रुपये 10 कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस वितरीत करण्यात आला आहे. लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया राबविली जावून, मुख्य इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली जाईल. राज्याचे नगरविकास मंत्री आणि आमचे स्नेही एकनाथ शिंदे यांचे याकामी भरीव सहकार्य लाभले आहे. असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.