पर्थ कसोटीत इतिहास रचण्यासाठी विराट सज्ज
पुजारा, द्रविडला मागे टाकण्याची नामी संधी : भारतीय फलंदाजांचा पर्थच्या खेळपट्टीवर लागणार कस
वृत्तसंस्था/ पर्थ
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळला जाणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. अशा परिस्थितीत फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी अनुभवी विराट कोहलीच्या खांद्यावर असेल. रोहितच्या अनुपस्थितीत चाहत्यांना पहिल्या कसोटीत विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पर्थ कसोटीदरम्यान विराटला मोठा विक्रम करण्याची संधी असेल.
पर्थ कसोटीसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्यामुळे जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे. विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यावर टीम इंडियाच्या फलंदाजीची प्रामुख्याने मदार असणार आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा तगडा अनुभव आहे. आता, ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याला चेतेश्वर पुजारा व राहुल द्रविड यांचा विक्रम मागे टाकण्याची संधी असणार आहे.
पुजारा, द्रविडला मागे टाकण्याची संधी
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 24 कसोटी सामन्यांच्या 44 डावांमध्ये 47.48 च्या सरासरीने 2042 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारताचा पाचवा खेळाडू आहे. पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात विराटने दोन्ही डावात एकूण 102 धावा केल्या तर तो दोन दिग्गज भारतीय फलंदाजांचे विक्रम मोडेल. पहिल्या कसोटी सामन्यात 33 धावा करुन कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजाराला मागे टाकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पुजाराच्या नावावर 2074 धावा आहेत. पुजारानंतर कोहलीला दिग्गज राहुल द्रविड यालाही मागे टाकण्याची मोठी संधी असेल. कोहली द्रविडच्या धावसंख्येपासून फक्त 101 धावा दूर आहे. द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54 कसोटी डावात 2143 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 74 कसोटी डावांमध्ये 3630 धावा केल्या आहेत.
कसोटीत कांगारुंविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर - 3630 धावा (74 डाव)
व्हीव्हीएस लक्ष्मण - 2434 धावा (54 डाव)
राहुल द्रविड - 2143 धावा (60 डाव)
चेतेश्वर पुजारा - 2074 धावा (45 डाव)
विराट कोहली - 2042 धावा (44 डाव)
खराब फॉर्म अन् दडपण
विराट बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. केवळ कसोटीतच नाही तर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही कोहलीची काही काळापासून चांगली कामगिरी झालेली नाही. यापूर्वी टीम इंडियाने घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला होता. आता बॉर्डर-गावस्प्कर ट्रॉफीत कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे, रोहित शर्मा नसल्याने टीम इंडियाच्या फलंदाजीची प्रमुख मदार त्याच्यावर असणार आहे.
सौरव गांगुलीची भविष्यवाणी, विराटचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा
2024 हे वर्ष देखील कोहलीसाठी आतापर्यंत चांगले राहिलेले नाही. कोहलीची बॅट ना बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत वा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चालली नाही. विराटच्या नावावर ऑस्ट्रेलियात अनेक कसोटी विक्रम आहेत. त्यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याचा फॉर्म परत येण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. विराटसाठी ही मालिका विशेष महत्त्वाची ठरु शकते, कारण हा त्याचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा कसोटी दौरा असू शकतो, असे सौरव गांगुलीचे मत आहे. 36 वर्षांचा असलेल्या कोहलीला भविष्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणे कठीण होऊ शकते.
गांगुली म्हणाला, तो एक चॅम्पियन फलंदाज आहे आणि त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली आहे. 2014 मध्ये त्याने 4 शतके आणि 2018 मध्ये एक शतक ऑस्ट्रेलियात झळकावले आहे. त्याला या मालिकेत आपली छाप सोडायला आवडेल आणि त्याला हे देखील जाणवेल की हा त्याचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. पुढे बोलताना तो म्हणाला, विराटच्या खराब फॉर्मविषयी मला फारशी चिंता नाही. न्यूझीलंडविरुद्ध खेळपट्ट्या फलंदाजीसाठी खूप कठीण होत्या, पण कोहलीला ऑस्ट्रेलियात चांगल्या विकेट्स मिळतील. मला पूर्ण आशा आहे की तो या मालिकेत चांगली कामगिरी करेल.
पर्थमधील नव्या खेळपट्टीवर हिरवेगार गवत, वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस रंगणार
बॉर्डर गावसकर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना मंगळवारी (19 नोव्हेंबर) सकाळी पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. अशा स्थितीत या पीचची पहिली झलक समोर आली. 22 यार्डांची ही खेळपट्टी पाहून फलंदाजांना अजिबात आनंद होणार नाही, हे मात्र नक्की. पर्थच्या खेळपट्टीला अजूनही पाणी दिले जात आहे, त्यामुळे पीचवर हिरवा रंग दिसतो आहे. यामागील एक कारण म्हणजे पृष्ठभाग लवकर कोरडे होत नाही. अशा स्थितीत खेळपट्टीकडून सीम मूव्हमेंट, पेस आणि बाउन्सची अपेक्षा केली जाऊ शकते.
मागील वेळेस म्हणजे तीन वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत पराभव केला. या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाने आपल्या नियोजनात मोठा बदल केला आहे. कांगारूंनी त्यांच्या ड्रॉप-इन खेळपट्ट्यांवर भरपूर गवत सोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या पीच वेगवान गोलंदाजीसाठी स्वर्ग बनल्या आहेत. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.