पंजाबमध्ये आता ऍन्टिकरप्शन हेल्पलाईन
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने वर‘कमाई’ला चाप
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये शहीद दिनी म्हणजे 23 मार्च रोजी ऍन्टिकरप्शन हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येणार आहे. या घोषणेच्या माध्यमातून राज्यात आता भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱया सरकारी अधिकाऱयांसोबत आपण आहोत, त्यामुळे आता भ्रष्टाचारी अधिकाऱयांची हप्ता वसुली बंद होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाब सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.
पंजाबमध्ये आता हप्ता वसुली बंद होईल. हप्त्यासाठी आता कोणताही नेता किंवा अधिकारी सामान्यांना त्रास देणार नाही, असे मुख्यमंत्री मान यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. येत्या 23 तारखेला भगतसिंह शहीद दिनानिमित्ताने ऍन्टिकरप्शन हेल्पलाईन नंबर शेअर करण्यात येणार आहे. 99 टक्के अधिकारी इमानदार आहेत. केवळ एक टक्का भ्रष्टाचारी लोकांमुळे यंत्रणेला डाग लागतो, असेही ते पुढे म्हणाले. हेल्पलाईनची घोषणा करण्याबरोबरच मान यांनी एक ट्विट करत आपला व्हॉट्सऍप नंबर शेअर केला आहे. कोणी लाच मागितली तर त्याचा व्हिडीओ किंवा ऑडिओ मला पाठवून द्या. भ्रष्ट अधिकाऱयाविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.