For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडने बांगलादेशचा हिशोब केला चुकता

06:28 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडने बांगलादेशचा हिशोब केला चुकता
Advertisement

दुसऱ्या कसोटीत यजमान बांगलादेशवर 4 गडी राखून विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने विजय मिळवत आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या कसोटीत किवी संघाने बांगलादेशचा 4 विकेटने पराभव करत मालिकेत बरोबरी साधली. या विजयासह किवीज संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, अष्टपैलू ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. फलंदाजी व गोलंदाजीत त्याने कमाल करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Advertisement

प्रारंभी, बांगलादेशने 2 बाद 38 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. फिरकीला अनुकुल असणाऱ्या या शेर ए बांगला स्टेडियमवर यजमान बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. सलामीवीर झाकीर हसन सोडला तर एकही फलंदाज किवीज गोलंदाजासमोर तग धरू शकला नाही. झाकीरने 86 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 59 धावांची शानदार खेळी साकारली. याशिवाय, नजमुल होसेन शांतो, मोमिनुल हक आणि तैजुल हसन या फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तसेच बाकी सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. यामुळे बांगलादेशचा डाव 35 षटकांत 144 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक 57 धावांत 6 गडी बाद केले. तर मिचेल सँटनरने 3 आणि टिम साउदीने 1 गडी बाद केला.

ग्लेन फिलिप्सची मॅच विनिंग खेळी

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 137 धावांचे लक्ष्य होते, पण ढाक्याच्या विकेटवर फिरकीपटूंना चांगलीच मदत मिळत होती, त्यामुळे किवी संघाला हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रचंड मेहतन करावी लागली. किवी संघाला पहिला धक्का 5 धावांवर बसला. सलामीवीर कॉनवे 2 धावा काढून परतला. यानंतर अनुभवी केन विल्यम्सन (11) व हेन्री निकोल्स (3) यांनी निराशा केली. याशिवाय, टॉम लॅथम (26), डॅरेल मिचेल (19), टॉम ब्लंडेल (2) हे स्टार खेळाडू झटपट बाद झाल्याने किवीज संघाची 6 बाद 69 अशी बिकट स्थिती झाली होती. पण, अशा कठीण परिस्थितीत बांगलादेश सामना जिंकेल असे वाटत होते, मात्र ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांनी शानदार भागीदारी करत यजमान संघाच्या आशा धुळीस मिळवल्या. ग्लेन फिलिप्स 48 चेंडूत 40 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर मिचेल सँटनर 39 चेंडूत 35 धावा करून नाबाद राहिला. ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांच्यात सातव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली. यामुळे न्यूझीलंडने विजयी लक्ष्य 39.4 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजने 3 किवीज फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 172 व दु.डाव सर्वबाद 144

न्यूझीलंड प.डाव 180 व दु.डाव 39.4 षटकांत 6 बाद 139 (लॅथम 26, विल्यम्सन 11, फिलिप्स नाबाद 40, सॅटनर नाबाद 35, मेहंदी हसन तीन बळी).

बांगलादेशची ऐतिहासिक विजयाची संधी हुकली

ढाका येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडने सर्वबाद 180 धावा करत 8 धावांची आघाडी घेतली होती. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात बांगलादेशला अवघ्या 144 धावाच करता आल्या. न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या 137 धावांचं लक्ष्य मिळालं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्याच्या चौथ्या दिवशीच 38 षटकांत 6 गडी बाद 138 धावा करून सामना जिंकून दिला. या पराभवासह बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची सोनेरी संधी गमावली. पहिल्या कसोटीत यजमान संघाने शानदार विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीत खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याने बांगलादेश विजय मिळवेल असे वाटत होते पण फिलिप्स व सँटनर यांनी शानदार कामगिरी करत बांगलादेशचा विजयाचा घास अक्षरश: हिरावून केला.

Advertisement
Tags :

.