नोकरांच्या शोषणप्रकरणी हिंदुजा कुटुंबीय दोषी
अब्जाधीशांना चार ते साडेचार वर्षांची शिक्षा
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
भारतीय वंशाचे अब्जाधीश आणि ब्रिटनचे सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंब नोकरांच्या शोषणाच्या प्रकरणात दोषी आढळले आहे. या कुटुंबातील चार जणांना शुक्रवार, 21 जून रोजी स्विस न्यायालयाने तुऊंगवासाची शिक्षा सुनावली. उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल हिंदुजा यांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मुलगा अजय आणि सून नम्रता यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे. निकालाच्या वेळी हिंदुजा कुटुंबातील चारही सदस्य न्यायालयात नव्हते. मात्र, त्यांचा व्यवस्थापक आणि पाचवा आरोपी नजीब झियाजी हजर होता. त्याला 18 महिन्यांची शिक्षा झाली आहे. हिंदुजा यांच्या वकिलांनी या निर्णयावर अपील केल्याचे सांगितले.
हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या स्वित्झर्लंड व्हिलामध्ये काम करणाऱ्या नोकरांना अधिकाधिक वेळ राबवून घेत त्यांचे शोषण केल्याचा आरोप होता. याप्रकरणी हिंदुजा कुटुंबाविऊद्ध सोमवारपासून (17 जून) स्वित्झर्लंडमध्ये खटला सुरू झाला होता. यात ते दोषी आढळले असले तरी न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंदुजा कुटुंबाने गेल्या आठवड्यात तक्रारकर्त्यांसोबत समझोता केला होता, परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने खटला पुढे चालू ठेवला. प्रकाश हिंदुजा 2007 मध्ये अशाच आरोपात दोषी आढळले होते. शिक्षा सुनावण्यापूर्वीच स्विस अधिकाऱ्यांनी हिरे, ऊबी आणि प्लॅटिनम नेकलेससह हिंदुजा कुटुंबाच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. हा ऐवज कायदेशीर खर्च आणि दंड भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो.