नूतन वर्षाचा संकल्प पर्यावरण संरक्षण
अगदी बालवयातच पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होणे हे दुर्मिळ असते. गाझियाबाद येथील 14 वर्षांचा विद्यार्थी आरव सेठ याने मात्र वयाच्या आठव्या वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेतला आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल आयुष्यासाठी आतापासूनच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हे समजण्याइतकी त्याची प्रगल्भता कौतुकाचा विषय बनली आहे. त्याने वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपले पर्यावरण संरक्षण अभियान चालविले आहे. हे अभियान आपले जीवनध्येय असून 100 त्याद्वारे 100 कोटी वृक्ष लावण्याचे ध्येय त्याने समोर ठेवले आहे. यासाठी शिक्षण संपल्यानंतर एक संस्था स्थापन करुन हे ध्येय आयुष्यभरात पूर्ण करण्याचा त्याचा विचार आहे.
आतापर्यंत गेल्या सहा वर्षांमध्ये त्याने आपल्या सवंगडय़ांच्या साहाय्याने हजारो रोपांची लागवड केली आहे. तसेच आपल्या वर्गमित्रांनीही असेच करावे, यासाठी त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या या प्रयत्नासाठी त्याला काही पुरस्कारही मिळाले असून त्यात क्रोडेरा पुरस्कार महत्वाचा आहे. केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर इतक्या लहान वयात तो यमुना आणि हिंडन नद्यांच्या स्वच्छता अमियानातही समाविष्ट झाला आहे. तो आणि त्याचे सहकारी सध्या ‘संडे फॉर सिक्युअर्ड फ्युचर’ नामक अभियान चालवितात. प्रत्येक नागरिकाने आपला रविवार हा सुटीचा दिवस पर्यावयण संरक्षणासाठी कार्य करण्यात व्यतीत करावा, असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. आता हजारो लोक या अभियानाची जोडले गेले आहेत. या अभियानाचे गुणगान परदेशांमध्येही होत आहे.