दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 232 अंकानी तेजीत
जागतिक सकारात्मक संकेताचा परिणाम : निफ्टी 12,129.50 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजीचे वातावरण राहिले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या भीतीने सोमवारी आणि मंगळवारी जागतिक शेअर बाजारांसोबत भारतीय बाजारात घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. बुधवारी सेन्सेक्स 232 अंकानी वधारला सोबत एचडीएफसी बँक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत राहिले होते.
दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 231.80 अंकानी वधारुन निर्देशांक 41,198.66 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 73.70 अंकानी वधारुन निर्देशांक 12,129.50 वर बंद झाला.
दिग्गज कंपन्यांमध्ये बुधवारी बजाज फायनान्सचे समभाग 4.95 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. सोबत नेस्ले इंडिया, आयटीसी, इन्फोसिस आणि एनटीपीसी यांचे समभाग वधारल्याची नोंद केली आहे. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, एचडीएफसी, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर तेजी
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे, त्या अगोदरच जागतिक व देशातील घडणाऱया सकारात्मक घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर पडल्यानेच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी जपान आणि दक्षिण कोरियातील बाजार नफ्यात राहिले आहेत. तर हाँगकाँगचा बाजार मात्र नुकसानीत आणि चीन बाजारात दबावाचे वातावरण राहिले होते. बेन्ट कच्च्या तेलाचा वायदा 0.71 टक्क्यांनी वाढून 59.93 डॉलर प्रति बॅरेल राहिला होता. अशी ही नोंद करण्यात आली आहे.