दुसऱया दिवशीही शेअर बाजारात घसरण
सेन्सेक्स 205 अंकानी घसरला : निफ्टी 12,169.85वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स 205 अंकानी घसरला आहे. दिवसभरातील व्यवहारात प्रामुख्याने वाहन बँकिंग धातू आणि एफएमसीजी यांच्या समभागातील नफा कमाई आशियाई शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण यांचे संपूर्ण पडसाद भारतामधील शेअर बाजारांवर पडल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 205.10 अंकानी घसरुन 41,323.81 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 54.70 अंकानी घसरुन 12,169.85 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 3.01 टक्क्यांनी घसरणीसह बंद झालेत, सोबत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती, एशियन पेन्ट्स, पॉवरग्रिड, आयटीसी आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग घसरले आहेत. अन्य कंपन्यांमधील अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, कोटक बँक, ओएनजीसी आणि टीसीएस यांचे समभाग मात्र वधारले आहेत.
तिमाही आकडे-जागतिक पडसाद
देशांर्गत शेअर बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांनी डिसेंबर तिमाहीतील नफा कमाई आकडेवारीचा अंदाज घेत सावध पावित्रा गुंतवणूकदारांनी घेतला आहे. तर दुसऱया बाजूला जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींमुळे देशातील शअर बाजारातील व्यवहारांवर तणावाचे वातावरण राहिले होते, त्यामुळे बाजार 200 अंकानी खाली आपटला.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (आयएमएफ) सोमवारी भारताचा आर्थिक विकासदर (जीडीपी) 4.8 टक्क्यांवर राहण्याचे अनुमान मांडले आहे. या अगोदर 6 टक्क्यांवर राहण्याचे आयएमएफने निश्चित केले होते. परंतु सदरच्या अहवालाचा परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले आहे. सध्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा कालावधी जवळ येतो आहे. त्यामुळे व्यापारासह उद्योग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात चढ उतार राहणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.