दिल्ली-गुजरातचे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात टायटन्स आज बुधवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी सामना करताना आवश्यक सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. मागील दोन स्पर्धांप्रमाणे टायटन्सची वाटचाल सुरळीत राहिलेली नाही, तरीही त्यांच्याकडे त्रुटी दूर करण्यासाठी वेळ आहे.
10 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सवर शेवटच्या चेंडूवर मिळविलेला विजय हा टायटन्सच्या मोहिमेला नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला निकाल होता. पहिल्या सहा सामन्यांमधून त्यांना फक्त दोनच विजय मिळवता आले आहेत. पण अजून आठ सामने बाकी असल्याने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाकडे परिस्थिती बदलण्यासाठी पुरेसा वेळ आहे. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीचा त्यांना फटका बसला आहे, परंतु त्यांनी उपलब्ध असलेल्या संसाधनांचा सर्वोत्तम वापर करणे आवश्यक आहे.
त्यांच्या उमेश यादवने सात बळी घेतले आहेत पण षटकामागे 10 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. त्याचा नवीन चेंडूवरील सहकारी स्पेन्सर जॉन्सन व अनुभवी मोहित शर्मा देखील त्यांच्या इकोनॉमी रेटमध्ये सुधारणा करू शकतात. प्रमुख फिरकीपटू रशिद खानने नेहमीप्रमाणे कमी धावा दिलेल्या आहेत, पण त्याने अधिक बळी मिळविणे आवश्यक आहे. मागील सामन्यात त्याच्या कामगिरीमुळे टायटन्सला रोमांचक विजय मिळविता आला आणि संघाला त्याच्याकडून फलंदाजीत अधिक अपेक्षा असतील.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला फॉर्म आणि फिटनेसच्या समस्यांमुळे संघर्ष करावा लागला आहे. पाच सामन्यांतील चार पराभवानंतर त्यांना लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या विजयाने खूप आवश्यक चालना मिळाली. परंतु प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांना आणखी बऱ्याच समस्या दूर कराव्या लागतील. पुन्हा तंदुऊस्त झालेल्या कुलदीप यादवच्या उपस्थितीने मोठा फरक घडवून आणला असून त्याने लखनौमध्ये योग्य वेळी तीन बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना तडाखा दिला. टायटन्सच्या फलंदाजांना त्याचा सामना करणे कठीण जाऊ शकते.
फलंदाजीत जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्सला तिसऱ्या क्रमांकावर सक्षम फलंदाज मिळाला आहे आणि हा ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्या पहिल्या आयपीएल सामन्यातील यशावर आणखी डोलारा उभारेल, अशी आशा त्यांना लागून राहिलेली असेल. त्यांचा एन्रिक नॉर्टजे मागील सामना खेळला नाही. मुकेश कुमारने पाच सामन्यांमध्ये षटकामागे 10 धावा दिल्या आहेत आणि एलएसजीविऊद्धच्या पुनरागमनाच्या सामन्यातही तो महागडा ठरला. संघासाठी सर्वांत मोठी सकारात्मक बाब कर्णधार रिषभ पंतचा फलंदाजीतील फॉर्म आहे. तो प्रत्येक सामन्यागणिक सुधारताना दिसत आहे. कॅपिटल्स डेव्हिड वॉर्नरवरही खूप अवलंबून आहेत. मागील तीन सामन्यांमध्ये फारसे योगदान देता न आल्यानंतर आता ती कसर भरून काढण्यास वॉर्नर उत्सुक असेल.
संघ-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, साई सुदर्शन, शाहऊख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशिद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बी. आर., मानव सतार.
दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धूल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्र, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, रिचर्डसन, रसिख दार सलाम, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.