दहा दिवसात इंधनदरात 6.40 रुपयांची वाढ
नवव्यांदा पेट्रोल-डिझेल दरांचा भडका : महाराष्ट्रात डिझेल शंभरीपार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील दहा दिवसात नवव्यांदा वाढ झाली. गुरुवारी इंधनदरात आणखी 80 पैशांनी वाढ झाली. यापूर्वी बुधवारीही 80 पैशांची वाढ झाली होती. गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6.40 रुपयांनी वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे नोव्हेंबरमध्ये सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपातीचा फायदाही संपला आहे.
गुरुवारच्या 80 पैशांच्या दरवाढीमुळे दिल्लीत आता पेट्रोल 101.81 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल दर 84 पैशांनी वाढून 116.72 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 107.45 रुपये (76 पैशांनी वाढ) आणि डिझेलची किंमत 97.52 रुपये झाली आहे, तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 111.35 रुपये आणि डिझेलची किंमत 96.22 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात गुरुवारी इंधनदरात प्रतिलिटर 83 पैशांची वाढ नोंद झाली आहे.
दररोज वाढणाऱया पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे वाहनधारकांच्या खिशाला चाप बसत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्यानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने करकपात करत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये कपात केली होती. मात्र, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मागील आठवडय़ापासून पुन्हा दरवाढीचा चटका सहन करावा लागत आहे.