दहशतवाद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आली होती अटक : आत्मघाती हल्ल्याचा होता कट
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमऋध्ये उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का बसल्याने दहशतवादी तबरक हुसैनचा मृत्यू झाला आहे. 21 ऑगस्ट रोजी नौशेरामध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नादरम्यान सुरक्षा दलांनी त्याला ताब्यात घेतले होते. हुसैन हा सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता.
दहशतवादी हुसैनच्या पायावर आणि खांद्याला गोळी लागली होती. जखमी झालेल्या दहशतवाद्याला सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौकशीदरम्यान हुसैनने भारतीय चौकीवर हल्ला करण्याच्या कटाचा खुलासा केला होता. हुसैनसोबत आणखी 4 दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी पाठविण्यात आले होते.
पाकिस्तानी कर्नल यूनुस चौधरीने या सर्व दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडल्यावर भारतीय सैनिकांवर आत्मघाती हल्ले करण्यासाठी पैसे अन् 4-5 बंदुका दिल्या होत्या. भारतीय सैन्यासोबतच्या चकमकीत हुसैन जखमी झाला तर त्याचे सहकारी पसार झाले होते.
हुसैनला 2016 मध्ये देखील याच भागात भारतीय सैन्याने अटक केली होती. तेव्हा तो स्वतःचा भाऊ हारुन अलीसोबत आला होता. परंतु सैन्याने तेव्हा मानवतेच्या आधारावर त्याची मुक्तता केली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये त्याची पाकिस्तानात रवानगी करण्यात आली होती.