दरवेळी नवा जोडीदार, मग मारतात लाथ
अखिलेश-जयंत यांच्यावर पंतप्रधान मोदींचे शरसंधान : कानपूरमध्ये प्रचारसभा संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेश निवडणुकीदरम्यान कानपूर ग्रामीणमधील अकबरपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले आहे. पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील मतदानाने राज्यात भाजप आणि योगी आदित्यनाथ यांचे सरकार मोठय़ा बहुमतासह येत असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीत काही जण दरवेळी जोडीदार आणतात, प्रत्येक निवडणुकीत जोडीदार बदलणारे जनतेसोबत कुठला न्याय करणार? निवडणूक संपताच स्वतःच्या जोडीदाराला लाथ मारणाऱयावर जनता विश्वास ठेवू शकत नसल्याचे म्हणत मोदींनी अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यावर शरसंधान केले आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोद प्रमुख जयंत चोधरी हे मतदारांची दिशाभूल करतात. पराभवानंतर ज्याला सोबत घेतले असते, त्याच्यावर पराभवाचे खापर फोडतात. 10 मार्चनंतर अखिलेश आणि जयंत परस्परांशी भांडत बसतील. सरकारमध्ये लूट करण्यासाठी समाजवादी पक्षाने वेगवेगळे भाग वाटले जायचे. भाऊ-पुतण्या आणि काकांचे भागही लूट करण्यासाठी वाटले गेले होते. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक शहरात माफियागंज गल्ली निर्माण करतील. उत्तरप्रदेशात भाजप सरकारमुळे माफिया अखेरच्या घटका मोजत आहेत. परंतु त्यांना समाजवादी पक्षासारखा डॉक्टर मिळाला तर ते पुन्हा बण् प्राप्त करू शकतात. उत्तरप्रदेशच्या जनतेने माफियांचे सरकार पुन्हा सत्तेवर आणू नये असे आवाहन मोदींनी सभेत बोलताना केले आहे.
10 मार्चपासूनच होळी
प्रत्येक वर्ग आणि जातीच्या लोकांनी कुठल्याही गोंधळात न पडता उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला मोठे बळ दिले आहे. माता आणि भगिनींनी भाजपला विजयी करण्यासाठी झेंडा हाती घेला आहे. मुस्लीम भगिनी गुपचूपपणे मोदींना आशीर्वाद देण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. जो सुख-दुःखात सोबत उभा राहतो, तोच कामाचा असतो हे मुस्लीम भगिनी-मुली जाणून आहेत. उत्तरप्रदेशच्या लोकांनी 2014, 2017 आणि 2019 मध्ये माफियांना हरविले आहे. आता 2022 मध्येही घराणेशाहीचे पाईक पुन्हा पराभूत होणार आहेत. उत्तरप्रदेशात यंदा रंगांची होळी होणार असून ती 10 दिवसांपूर्वीच साजरी केली जाईल. 10 मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यावर मोठय़ा जल्लोषात होळी सुरू होणार असल्याचे मोदी म्हणाले.
ममता बॅनर्जी लक्ष्य
गोव्यात निवडणूक लढविणाऱया ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल नेत्याने मुलाखतीत दिलेले उत्तर गांभीर्याने घेतले जाण्याची गरज आहे. गोव्यातील मतदारांनी स्वतःच्या मतांनी फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱयांना प्रत्युत्तर द्यावे. गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला राज्यात पक्षाचे अस्तित्व नसताना निवडणूक का लढवताय असे विचारण्यात आले होते. तेव्हा त्याने गोव्यात हिंदू मते विभागण्यासाठी एका पक्षासोबत आघाडी केल्याचे उत्तर दिले. तृणमूलचा नेते उघडपणे हिंदू मते विभागणार असल्याचे सांगतोय, मग तो कुणाची मते एकत्रित करू पाहतोय याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. अशाप्रकारच्या राजकारणाला दफन करण्याची निवडणूक हीच नामी संधी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.